मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेत तब्बल ७०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट खुद्द राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नाशिकमध्ये सर्वसामान्यांना घरे उपलब्ध व्हावी यासाठी म्हाडाच्यावतीने नाशिक महापालिकेकडे भूखंड दिले. मात्र, या भूखंडांवर घरेच निर्माण झाले नसल्याची धक्कादायक बाब आव्हाड यांनी उजेडात आणली आहे.
मंत्री आव्हाड यांनी म्हटले आहे की, नाशिक महापालिका आयुक्त हे खोटे बोलत आहेत. आव्हाड यांनी आजच काही ट्वीट केले आहेत. त्यात ते म्हणतात की, नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आधी 34 प्रकल्प म्हाडा संबंधी सांगितले. त्यानंतर त्यांच्या नगररचनाकाराने ते 84 असल्याचे सांगितले. हे सगळे प्रकल्प सदनिकांसंबंधी होते. आणि एक एकरच्या पुढचे लेआऊट किती आहेत याचा कुठलाही हिशोब द्यायला महानगरपालिका तयार नाही.कारण ते लेआऊट फक्त आयुक्तांच्या सहीने मंजूर होतात. हा सगळा घोटाळा फार मोठा आहे. याबाबत पोलीस खात्याकडे तक्रार करावीच लागेल, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1485616128739389440?s=20
आव्हाड यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, नाशिक शहरासाठी गृहनिर्माण प्रकल्प व्हावे यासाठी म्हाडा आग्रही राहिली आहे. म्हणूनच म्हाडाने उपलब्ध करुन दिलेल्या भूखंडांद्वारे शहरात तब्बल ३५०० घरे उपलब्ध होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात नाशकात दीडशेच घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. दिलेल्या भूखंडांचा कुठलाही हिशोब दिला जात नाही. या सर्व प्रकाराला नाशिक महापालिका आयुक्तच जबाबदार आहेत. कारण, त्यांच्या स्वाक्षरीनेच भूखंड मंजूर होतात. अद्यापही नाशिक महापालिकेने सर्व भूखंडांचा हिशोब देण्यात आलेला नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अशा काळातच मंत्री आव्हाड यांनी घोटाळ्याचे हे प्रकरण समोर आणले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन आता यापुढील काळात आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाला वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या घोटाळा आणि टीकेला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.