नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेने शहरवासियांसाठी बंपर ऑफर आणली आहे. त्यामुळे तुम्हाला जर घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरायची असेल तर आताची ही संधी चुकवू नका. कारण, हा कर भरण्यासाठी महापालिकेकडून तब्बल १३ टक्क्यांची सूट मिळत आहे. जर, तुमचा कर १ हजार रुपयांचा असेल तर तुम्हाला १३० रुपयांची घसघशीत सूट मिळणार आहे. त्यामुळे तातडीने कर भरा. कर सवलतीला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ११ दिवसांत तब्बल साडे आठ कोटी रुपयांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा झाला आहे.
महानगरपालिकेने सन २०२३- २०२४ या वर्षातील एक रक्कमी भरणा करणा-या करदात्यांना १ एप्रिलपासून सूट जाहीर केलेली आहे. नाशिक मनपा हद्दीतील मिळकतधारक, भोगवटाधारकांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या ११ दिवसात ८ कोटी ३३ लाख १७ हजार ५५५ रुपये इतका मालमत्ता कर मनपाकडे जमा झाला आहे. नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक १ कोटी ७५ लाख ७७ हजार ५३० रुपये जमा झाले आहेत.
सन २०२२-२३ या वर्षांत मनपाने कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. याकामी मा. आयुक्त आणि कर विभाग उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील संपूर्ण कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी या सर्वांनी मिळून सातत्याने प्रभावीपणे वसुली मोहिम राबवुन उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आता सन २०२३- २०२४ या वर्षाच्या सुरुवातीलाही मनपाने करांमध्ये सुट दिली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे. सर्व मालमत्ताधारकांना विनंती आहे की, चालू वित्तीय वर्षाचे देयक nmctax.in आणि nmc.gov.in या संकेतस्थळावर इंडेक्स क्रमांक टाकल्यानंतर प्राप्त होईल. त्यानुसार सदर संकेतस्थळावर नागरिक सूट प्राप्त करू शकतात, असे आवाहन मनपाच्या कर विभागाकडून करण्यात आले आहे.
*विभागनिहाय मालमत्ता कर जमा*
१. सातपूर – ६५ लाख १७ हजार ७९६ रुपये
२. नाशिक पश्चिम – १ कोटी ६० लाख ५२ हजार ३९१ रुपये
३. नाशिक पूर्व – १ कोटी ७५ लाख ७७ हजार ५३० रुपये
४. पंचवटी – १ कोटी ४२ लाख ६२ हजार ४०६ रुपये
५. नवीन नाशिक – १ कोटी ५१ लाख ५५ हजार ४६४ रुपये
६. नाशिकरोड – १ कोटी ३७ लाख ५१ हजार ९६८ रुपये
एकूण – ८ कोटी ३३ लाख १७ हजार ५५५ रुपये
अशी आहे कर सवलत
१. एप्रिलमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ता करावर ८ टक्के सूट
२. मेमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ता करावर ६ टक्के सूट
३. जूनमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ता करावर ३ टक्के सूट
४. या व्यतिरिक्त ऑनलाईन भरणा केल्यास वरील सवलतीसह संपूर्ण कराचा भरणा केल्यास सर्वसामान्य करात ५ टक्के सूट मिळेल
#taxscheme सामान्य करात ८ टक्के सवलत मिळवण्यासाठी आजच कर भरून आपली आर्थिक बचत करा.#tax #nashik #paytoday #getbenefit pic.twitter.com/QLmnjemUkX
— mynmc (@my_nmc) April 13, 2023
Nashik Municipal Corporation Property Tax Bumper Discount