नाशिक – शहरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. याचअंतर्गत रविवारच्या (१६ मे) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. रविवारी (१६ मे) नाशिक शहरातील लसीकरण बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. हे लसीकरण बंद राहणार असल्याने रविवारी कुठल्याही लसीकरण केंद्रावर कुणीही गर्दी करु नये, असे आवाहन नाशिक महापालिकेने केले आहे.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या नव्याने आलेल्या आदेशानुसार, १५ मे २०२१ पासून नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आता कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्याचा कालावधी हा ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे असा केलेला आहे.
१५ मे च्या आधी कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आता ८४ दिवस झाल्यानंतरच दुसरा डोस मिळणार आहे.
शनिवार १५ मे पासून ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले असतील अशाच नागरिकांना कोविशील्ड लसीचा दुसरा डोस मिळणार आहे.
तसेच कोवॅक्सिन या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे अंतर पूर्वी प्रमाणे २८ ते ४२ दिवसच राहणार आहे.
तरी ज्या नागरिकांचे कोविशील्ड या लसीचे ८४ दिवस पूर्ण झालेले नसतील अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, असे आवाहन नाशिक महानगरपालिका प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.