नाशिक – पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज बैठक घेतली.
बैठकीत आयुक्तांनी विविध प्रकारचे निर्देश दिले. श्री गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणेच्या दृष्टीने श्री गणेशोत्सवात शाडू माती मुर्तीची प्रतिष्ठापना करणेकामी जनजागृती व प्रबोधन करणेत येईल, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने घरी पाण्यात अमोनिअम बायकार्बोनेट पावडर टाकून त्यामध्ये श्री गणेश मुर्ती विसर्जन करणेकरीता नागरीकांना अमोनिअम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करून देणे, त्याकरीता नाशिक महानगरपालिकेमार्फत श्री मुर्ती विक्री ठिकाणी पावडर वाटपाकामी स्टॉल उभारणे, मार्गदर्शक सुचना फलक लावणे आणि श्री मुर्तीचे वजनाविषयी संबंधित विक्रेत्यांनी उल्लेख करणेबाबत त्यांना सुचना देणे इ.कार्यवाही करणेत येईल.
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणेच्या दृष्टीने नागरीकांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा याकरीता शाडू मातीची मुर्ती तयार करणे, पर्यावरणपुरक आरास तयार करणे व श्री मुर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करणे इ.कामी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करणेत येईल. या गणेशोत्सवात श्री गणेशोत्सव विसर्जनाकरीता ऑनलाईन स्लॉट बुकींग करणे हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेत येणर आहे. त्याकरीता व्यापक प्रसिध्दी करणेत येईल व श्री गणेश विसर्जनाकरीता ऑनलाईन स्लॉट बुकींग करणाऱ्या नागरीकांसाठी श्री विसर्जनाकरीता स्वतंत्र व्यवस्था करणेत येऊन प्राधान्य देणेत येईल. ऑनलाईन स्लॉट बुकींगमार्फत श्री विसर्जन करणाऱ्या नागरीकांना क्युआर कोड जनरेट झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत ई-सर्टिफिकेट प्रदान करणेत येईल.
तसेच, पर्यावरण संवर्धनाच्या व कोविड-19 च्या त्रिसूत्रीचे पालन करणेच्या दृष्टीने फिरता कृत्रिम विसर्जन तलाव (Tank on Wheel) हा अजून एक नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणेत येणार आहे. याकामी 50 किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या इमारती, सोसायटया, कॉलनीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविणेत येणार आहे. या उपक्रमाकरीता प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे सहा विभागाकरीता एकूण 6 फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करून देणेत येतील. यामुळे, नागरीकांची रस्त्यावर अथवा विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड-19 च्या प्रादुर्भाव व प्रसारास प्रतिबंध होईल.
श्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात श्री गणेश विसर्जनाकरीता कृत्रिम तलावांसह विसर्जन ठिकाणे निश्चित करणेत येऊन त्या ठिकाणी श्री गणेश मुर्ती व निर्माल्य संकलनाकरीता आवश्यक व्यवस्था करणेत येईल. तसेच, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने व नदीपात्रांचे जल प्रदुषण होऊ नये याकरीता नागरीकांच्या माहितीकरीता श्री मुर्ती दान करणे व निर्माल्य संकलित करणे कामी बॅनर्स श्री विसर्जनांच्या ठिकाणी लावणेत येतील. याकामी विविध स्वयंसेवी, शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेत आहोत.
श्री गणेशोत्सव पर्यावरणपुरक व आनंददायी होणेच्या दृष्टीने नागरीक व सेवाभावी संस्था यांचा व्यापक प्रमाणावर सहभाग होणेच्या दृष्टीने सोशल मिडीयावर जास्त फॉलाअर्स असणाऱ्या नागरीक/संस्था तसेच, मनपाने नियुक्त केलेले ब्रँड ॲम्बेसिडर यांची मदत घेतली जाईल. नाशिक महानगरपालिकेमार्फत करणेत येणाऱ्या उपाययोजनांना नागरीकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे.