नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिका आयुक्त रमेश पवार हे सध्या शहरातील विविध प्रश्न समजून घेण्यासाठी ठिकठिकाणचा दौरा करीत आहेत. स्मार्ट सिटीच्या विकासकामांची पाहणी केल्यानंतर आता त्यांनी शहराच्या विविध भागात दौरे सुरू केले आहेत. याअंतर्गत त्यांनी आज सातपूर परिसराचा दौरा केला. अमृत गार्डन ते बारदान फाटा या दरम्यानचा डी.पी. रस्ता विकास आराखड्या प्रमाणे तयार करण्याच्या दृष्टीने सर्व्हे करून त्यात येणारी अस्तित्वातील कमीत कमी झाडे काढण्याची आवश्यकता भासेल या दृष्टीने नियोजन करून या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूने एक एक लेन कशी वाढेल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर शहरातील इतर भागातील विकासाच्या दृष्टीने आज सोमवार दि.०४/०४/२०२२ रोजी सातपूर व परिसराची पाहणी मा.आयुक्त रमेश पवार यांनी केली.अमृत गार्डन ते बारदान फाटा या दरम्यान ३६ मीटर रस्ता महापालिकेच्या माध्यमातून रुंदीकरण करण्यात येत आहे हा रस्ता शहर विकास आराखड्या प्रमाणे करण्याच्या दृष्टीने स्वतंत्ररित्या सर्व्हे करून त्यामध्ये रस्त्यात येणारे अडथळे अतिक्रमण, भूसंपादन याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करावा तसेच या रस्त्यात अस्तित्वात असणारी जास्तीत जास्त वृक्षांची जोपासना होईल व ती काढून टाकावी लागणार नाहीत.यादृष्टीने टोटल स्टेशन सर्व्हे शीट तयार करण्याच्या सूचना बांधकाम व नगरनियोजन विभागास देण्यात आल्या.
सातपूर गावठाण परिसरात उघड्यावर टाकण्यात आलेला कचरा या पाहणी दौऱ्यात मा.आयुक्त रमेश पवार यांच्या निदर्शनास आला.याबाबत विभागीय अधिकारी यांना कडक शब्दात समज देण्यात येऊन एक महिन्याच्या आत या ठिकाणी कचरा पडणार नाही हा सर्व कचरा घंटागाडीत पडेल या दृष्टीने नियोजन करून हा ब्लॅक स्पॉट भविष्यात उद्भवणार नाही याबाबत नियोजन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
या पाहणी दौऱ्यात सातपूर परिसरातील सातपूर गाव महिंद्रा गेट क्रमांक १, प्रबुद्ध नगर,अंबड लिंक रोड या परिसरास भेट देऊन तेथील ब्लॅक स्पॉटची पाहणी यावेळी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी भाजी मंडई,सातपूर गाव, खोका मार्केट,नासर्डी पूल,सातपूर एमआयडीसी,त्रंबक रोड,अंबड लिंक रोड,नंदिनी पूल या परिसरात नियमित स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना विभागीय अधिकारी व घनकचरा व्यवस्थापन संचालक यांना दिल्या. सिडको विभागातील चुंचाळे घरकुल परीसराला यावेळी भेट देऊन तेथील परिसराच्या स्वच्छते बाबतची पाहणी मा. आयुक्त रमेश पवार यांनी केली.शहरात उघडयावर कचरा साठवला जाणार नाही याचे नियोजन करून कार्यवाही करणेस संमधीत विभागीय अधिकाऱ्यांना सांगणेत आले.
शहरात कुठेही ब्लॅक स्पॉट राहणार नाही याबाबत स्वच्छता विभागाने दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी मा.आयुक्त रमेश पवार यांनी दिली सध्या ज्या ठिकाणी असा कचरा पडत आहे.तो सर्व कचरा घंटागाडीत जाईल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सातपूर व परिसरात झालेल्या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे,शहर अभियंता नितीन वंजारी,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,विभागीय अधिकारी नितीन नेर, कार्यकारी अभियंता आर एस पाटील,नगर नियोजन विभागाचे कार्यकारी अभियंता संजय अग्रवाल,स्वच्छता निरीक्षक श्रीमती तांबे आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.