नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या नाशिक शहरांमध्ये विकासासाठी पोषक अशा मूलभूत सोयी मुबलक पाणी तसेच सांडपाणी व घनकचऱ्याचे योग्य नियोजन आहे. याच सोबत शहराकडे सकारात्मकरित्या बघण्याची दृष्टी असणाऱ्या क्रेडाई नाशिक मेट्रो सारखी संस्था सोबत असल्याने आगामी काळात देखील नाशिक प्रगतीपथावर जाईल असे गौरवोद्गार नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी काढले. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 2021 ते 23 या कालावधीमधील दुसऱ्या वार्षिक सभेमध्ये ते बोलत होते.
आपल्या भाषणात आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक शहराच्या विकासाबाबत आगामी कालावधीत होणाऱ्या काही बाबी
१) शहर विकासासाठी काही शॉर्ट टर्म व काही लॉंग टर्म योजना
२) गोदावरी साठी नमामि गोदा योजनेअंतर्गत मध्ये ब्ल्यू लाईन मध्ये डीपी रोड साईडने सिवर लाईन टाकणे व वरील जागेचा मीयामाकी पद्धतीने विकास. याचे काम आगामी कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण करणार.
३) दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास फिल्म सिटीच्या धर्तीवर.
४) सगळीकडे उड्डाणपूल उभारण्याऐवजी मॉडेल रोड ही संकल्पना. पहिल्या वर्षी सहा रोड तयार करणार.
५) 132 चौकांचे सुशोभीकरण करणार
६) आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, निओ मेट्रो ला गती देणार.
सोबतच बांधकाम वेस्ट चे योग्य नियोजन तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी नियोजन, नियमित फायर ऑडिट, बेसमेंटचे योग्य नियोजन करून बांधकाम व्यवसायिकांनी महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले. याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन, राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार (घटना समिती) जितेंद्र ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल ,नाशिक क्रेडाई मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर , माजी अध्यक्ष सुरेश पाटील व उमेश वानखेडे, नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे व जीएसटी सल्लागार संकेत शहा उपस्थित होते.
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की, सर्वसाधारण सभेमध्ये विविध तज्ञांना बोलावून ज्ञानसंवर्धन करणे ही एक चांगली प्रथा क्रेडाईने अंगीकारली आहे याचा फायदा सर्व सभासदांना होत आहे. नाशिकचा विकास व्हावा तसेच नाशिकचे ब्रँडिंग होण्यासाठी वेळोवेळी क्रेडाई विविध उपक्रम राबवित असते. नुकत्याच एप्रिलमध्ये झालेल्या प्रॉपर्टी एक्सपोमुळे शहरातील अर्थकारणास गती मिळाली आहे. देशातील सर्वोत्तम ठरेल असे एक्सलन्स सेंटर नाशिक मध्ये क्रेडाई तर्फे उभारले जात असून कोविड काळात क्रेडाई तर्फे उभारलेल्या कोविड सेंटर साठी क्रेडाईला नुकतेच गोदा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .शहराच्या विकासासाठी व्यावसायिक मालमत्तेवरील घरपट्टीच्या दरात कपात करण्याची आग्रही मागणी देखील त्यांनी केली.
आपल्या भव्यतेसाठी ओळखले जाणारे गृहप्रदर्शन शेल्टर ची आयोजन 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान क्रेडाई तर्फे शहरातील डोंगरे वस्तीगृह मैदानावर होणार असल्याची घोषणा अध्यक्ष रवी महाजन यांनी केली. या प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष कृणाल पाटील हे काम बघणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले की, नाशिक जिल्ह्याचा महसूल 2022 मध्ये 1064 कोटी असून यामध्ये क्रेडाई सदस्यांचे मोलाचे योगदान आहे. नोंदणी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी शासन विविध उपायोजना करत असून नुकताच बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातूनच नोंदणी करण्यात येईल असा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अन्य शहरात असलेली 50 सदनिकांची अट ही नाशिककरिता शिथिल करण्यात आली आहे नाशिक मधील ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांच्या इमारतीमध्ये 20 सदनिका आहेत ते व्यावसायिक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यास नजरेसमोर ठेवून महानगरपालिकेने पावले उचलावीत. इज ऑफ डूइंग बिझनेस याची अंमलबजावणी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रो महानगरपालिकेला सहकार्य करेल. लवकरच क्रेडाई नाशिक मेट्रो विजन डॉक्युमेंट तयार करत असून यामध्ये गोदावरीच्या पुराचे नियोजन, बफर डॅमची निर्मिती, आऊटर रिंग रोड, झोपडपट्टी विरहित शहर अशा अनेक बाबींचा समावेश असेल. त्याचप्रमाणे सिंहस्थासाठी राखीव अशा तपोवन आतील जागेवर फक्त एक वर्ष वापरत असतो पण उर्वरित अकरा वर्ष ही जागा वापरता यावी यासाठी अद्ययावत कन्व्हेन्शन सेंटर उभारावे व वॉकिंग हॅपिनेस इंडेक्स साठी नाशिक मध्ये काम व्हावे.
महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव सुनील कोतवाल म्हणाले की, 2030 पर्यंत शहरात अमुलाग्र बदल होणार असून शहराची लोकसंख्या तीस लाखापर्यंत जाईल. यामुळे विविध व्यवसायांसाठी अनेक संधी आहेत पण हा विकास योजनाबद्ध, शाश्वत आणि नाशिकच्या मूळपणास अनुसरून असावा. यासाठी क्रेडाई ने “मी जबाबदार नाशिककर” ही भूमिका घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करण्याचे ठरविले आहे.
या बैठकीत क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव गौरव ठक्कर यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. सूत्रसंचालन सचिन बागड यांनी केले तर आभार सहसचिव अनिल आहेर यांनी मानले .याप्रसंगी क्रेडाईचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nashik Municipal Commissioner Present Vision in Credai Conference