नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकची पहाणी मा.आयुक्त रमेश पवार यांनी केली.यावेळी निदर्शनास आलेल्या त्रुटीवरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करून पंधरा दिवसात त्रुटींचे निराकरण करण्याचे निर्देश यावेळी संबंधित विभागांना दिले.
नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आलेले आहे त्यामध्ये स्वामी समर्थ जॉगिंग ट्रॅक, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक,गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक,शिवराम वझरे जॉगिंग ट्रॅक,मनोहर नगर,इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक इत्यादी ठिकाणच्या जॉगिंग ट्रॅकची पाहणी मा.आयुक्त रमेश पवार यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.
यावेळी विविध प्रकारच्या समस्या व अडचणी नागरिकांनी निदर्शनास आणल्या त्यामध्ये जॉगिंग ट्रॅकवर वेळोवेळी पाणी न मारणे,पावसाळ्यात जॉगिंग ट्रॅकवर व बाजूला पाणी साठणे,परिसरात असलेली झाडाच्या फांद्या छाटणी झालेल्या नसणे, झाडांना वेळोवेळी पाणी न घातल्याने झाडे सुकलेली असणे,काही भागातील जॉगिंग ट्रॅक खराब झालेले असणे, रेन वॉटर ड्रेन नसणे, सार्वजनिक शौचालयाची नियमित स्वच्छता नसणे त्यांचे दरवाजे सुस्थितीत नसणे,म्युझिक सिस्टीम जॉगिंग ट्रॅक वर नियमित सुरू नसणे,स्प्रिंक्लर बंद असणे अश्या त्रुटी या पाहणीच्या वेळी निदर्शनास आल्या.
या सर्व त्रुटींबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित जॉगिंग ट्रॅक वरील बंद स्प्रिंक्लर त्वरित सुरू करून जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्याची व स्वच्छता करण्याची वेळ निश्चित करून कार्यवाही करणे, जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने व परिसरात लावण्यात आलेली सुकलेली झाडांना पाणी घालून त्यांचे संगोपन करणे तसेच ज्या झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत त्याचे छाटणी करणे, जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करणे सार्वजनिक शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता करून त्याची देखभाल होण्याच्या दृष्टीने नियोजन करणे,जॉगिंग ट्रॅक परिसरात असणाऱ्या जागेत नव्याने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपन करणे, झाडांच्या बुंध्यास रंगरंगोटी करणे,जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने ग्रिल लावुन सुशोभित करणे कृषी नगर जॉगिंग ट्रॅक येथे उद्यान विकसित करणे याबाबत एक महिन्याचे आत निराकरण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात येऊन या बाबतची पाहणी ३० दिवसानंतर परत करण्यात येणार असल्याचे मा.आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.या पाहणीच्या वेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे, शहर अभियंता नितीन वंजारी,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,कार्यकारी अभियंता सुनील रौंदळ,विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी,सुनील शिरसाठ,उद्यान निरीक्षक भालेराव आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.