नाशिक – नाशिक-मुंबई महामार्गाच्या दूरवस्थेमुळे जिकीरीच्या झालेल्या प्रवासात जीवघेण्या अपघाताच्या शक्यता निर्माण करणाऱ्या अनधिकृत गतिरोधकांची भर पडली असून त्याकडे ‘नाशिक सिटिझन्स फोरम’ने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अर्थात ‘न्हाई’चे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारचे गतिरोधक हे महामार्ग निर्मितीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारे असल्याचे खुद्द महामार्ग मंत्रालयाचेच म्हणणे असल्याचे दर्शविणारा एक अध्यादेशही फोरमने या तक्रारीसोबत सादर केला आहे.
देशातील दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील नाशिक ते मुंबई दरम्यान रस्त्याची दूरवस्था गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली आहे. त्यासंदर्भात नाशिक सिटीझन्स फोरमने वेळोवेळी विविध स्तरांवर दाद मागण्याचे प्रयत्न केले आहेत. मा. उच्च न्यायालयानेही या समस्येची दखल घेत निर्देश दिले आहेत. मात्र, नाशिकच्या विकासाचा एक प्रमुख आधार असलेल्या या महामार्गाच्या समस्या अजूनही दूर झालेल्या नाहीत. याबाबत नाशिक सिटीझन्स फोरमने खेद व्यक्त करणारे पत्र ‘न्हाई’ला दिले आहे.
या पत्रात फोरमने म्हटले आहे की, नाशिक-मुंबई महामार्गाच्या खराब स्थितीमुळे एकीकडे अनेक अपघातप्रवण जागा तयार झाल्या असताना त्यात आता विविध ठिकाणच्या गतिरोधकांचीही भर पडली आहे. विशेषतः कसारा घाट परिसरात अनेक ठिकाणी तयार केलेले गतिरोधक हे जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरण्याची धास्ती निर्माण झाली आहे. वास्तविक खुद्द केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महामार्गावरील गतिरोधकांविरोधात यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली आहे. यासंदर्भात मंत्रालयाने १९९६, १९९८, २०००, २००१,२००२ साली परिपत्रकेही काढलेली आहे. या परिपत्रकांचा संदर्भ देत महामार्गावरील गतिरोधक काढण्याच्या संदर्भातील दि. ११ एप्रिल २०१६ रोजीचे परिपत्रक फोरमने न्हाई‘ला सादर केले आहे.
वेगवान आणि विनाअडथळा वाहतूक व्हावी हाच महामार्ग तयार करण्याचा मुळ उद्देश्य असतो. त्यास जणू हरताळ फासण्याचे कामच हे गतिरोधक करत आहेत. अतिशय अपरिहार्य जागीही स्पीड ब्रेकर्स नव्हे तर रम्बल स्ट्रीप्स असाव्यात व त्याही सक्षम अधिकाऱ्यामार्फत निर्धारित प्रक्रियेद्वारे सुनिश्चित केल्या जाव्यात, असे मंत्रालयाचे स्पष्ट आदेश आहेत. म्हणून नाशिक-मुंबई महामार्गावरील सर्वच स्पीडब्रेकर्सबाबत योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी मागणी नाशिक सिटीझन्स फोरमने ‘न्हाई’कडे केली आहे.