नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवला. रस्त्याचे निकृष्ट काम आणि दुरुस्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची त्यांनी मागणी केली. उपमुख्यमंत्र्यांकडेही यासंदर्भात बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यास प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींची स्वतंत्र बैठक या विषयावर घेण्याची ग्वाही दिली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार फरांदे म्हणाल्या की, नाशिक मुंबई महामार्गाची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली आहे. या महामार्गात केवळ खड्डे आणि खड्डेच असल्यामुळे येथून मार्गक्रमण करणे वाहन चालकांना जिकरीचे जाते. जवळपास २०० किलोमीटर इतक्या रस्त्यावर केवळ एक जेसीबी आणि पाच कर्मचारी काम करताना दिसतात. इतक्या हळुवार पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम सध्या सुरू आहे.
संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे आणि यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी अशी मागणी आमदार प्रा. सौ. फरांदे यांनी केली. त्यास प्रतिसाद देत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमानुसार कार्यवाही करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. दरम्यान, यासंदर्भात आमदार फरांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पत्र दिले. त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच नाशिक मुंबई महामार्ग संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.