नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिनेमा बघणे एकाच्या जीवावर बेतले आहे. थिअटरमध्ये श्वास गुदमरल्याने ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून ही घटना कॉलेजरोड परिसरातील मल्टी मॅक्स थिअटर येथे घडली असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद जुगलकिशोर चोरडिया (रा.क्रिकेट ग्राऊंडमागे,महात्मानगर) असे मृत इसमाचे नाव आहे. चोरडिया शुक्रवारी (दि.१८) रात्री बिगबाजार मधील मल्टी मॅक्स थिअटर येथे चित्रपट बघण्यासाठी गेले होते. दोन नंबर स्क्रिन हॉलमध्ये अभिनेते अक्षय कुमार यांचा ओएमजी २ हा चित्रपट बघत असतांना ही घटना घडली. रात्रीचा नऊ ते बाराचा शो बघत असतांना मध्यांतरानतर चित्रपटाचा शेवट सुरू असतांना अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. यावेळी छातीत दुखून ते बेशुध्द झाल्याने मध्यरात्री अभय कोठारी यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.