नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल जलद गतीने देश,विदेशात पोहचविता यावा यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनी बरोबर काम करण्यासाठी जेएनपीटीने सकारात्मकता दर्शविल्याने मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लॉजिस्टिक पार्कसाठी जिल्हयातील निफाड, मुंढेगाव आणि शिलापूर येथील जागा प्रस्तावित असून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणीच्या कामास गती देण्याचे आदेश उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले आहे.
मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणीच्या कामाला गती मिळावी यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना नामदार सामंत यांनी वरील आदेश दिले आहेत. नाशिक जिल्हा कृषीप्रधान जिल्हा असून कांदा, द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला आदी शेतीमाल विक्रीसाठी परराज्यात तसेच परदेशात पाठविला जात असतो. महामार्गाने शेतीमाल जाण्यास वेळ लागत असल्याने सदर शेतीमाल जलद गतीने देश, विदेशात पोहचविता यावा यासाठी निफाड साखर कारखाना येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे.
यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील आहेत. निफाड जागेसंदर्भात काही अडचण असल्यास इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव तसेच नाशिक तालुक्यातील शिलापूर येथे उपलब्ध असलेल्या शासकीय जागांचा लॉजिस्टिक पार्क उभारणीसाठी विचार करावा अशा सूचना खासदार गोडसे यांनी केल्या होत्या. केंद्र शासनाकडून निफाड, शिलापूर आणि मुंढेगाव येथील जागांची पाहणीही करण्यात आलेली आहे.
लॉजिस्टिक पार्क उभारणीच्या कामाला गती मिळण्याकामी मंत्रालयात विषेश बैठकीचे आयोजन करण्यासाठी खासदार गोडसे यांचा उद्योग विभागाकडे सततचा पाठपुरावा सुरू होता. त्या अनुषंगाने आज नामदार उदय सामंत यांच्या प्रमूख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकापरी अधिकारी बिपीन शर्मा, खासदार गोडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. सामंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणीच्या कामाविषयीचा आढावा घेतला.
निफाड, मुंढेगाव, शिलापूर येथील जागांची माहिती घेतली. नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य त्या जागेच्या हस्तांतरासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारणीच्या कामाला गती देण्यात यावी अशा सूचना वजा आदेश यावेळी नामदार सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Nashik Multi Model Logistic Park Industry Minister Meet