नाशिक – नाशिक – मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून मुंबई नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. आता मात्र पाच ते सहा तासाहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी केली.
त्यांच्या हस्ते आज नाशिक शहरातील रुंगटा बेलाविस्टा येथील सुविधा क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी याठिकाणी उपस्थित पत्रकारांशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना ते बोलत होते.
यावेळी राज्यातील शिवभोजन केंद्र चालवणाऱ्या संस्थांची तीन महिन्यांपासून अनुदान शासनाकडून मिळाले नसल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्वाची योजना सुरू केली होती. गोरगरीब जनतेच्या हितासाठी शासनाने ही सुरू ठेवावी तसेच शिवभजन केंद्र चालवणाऱ्या संस्थाचे थकलेले अनुदान लवकरात लवकर अदा करण्यात यावे याबाबत आपण अधिवेशनात मागणी करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुठले हिंदू सण साजरे होतात की नाही असे वाटत होते आता मात्र सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, गेली दोन वर्ष जगभरात कोरोनाचे सावट होते. त्यामुळे कोणीही जास्तवेळ घराबाहेर पडू शकत नव्हते एकत्र येऊ शकत नव्हते. ही परिस्थितीत देशात नाही तर अख्या जगात होती. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील लॉकडाऊनची घोषणा केली होती. सणवार साजरे करण्यासाठी खुद्द शासनाचीच नियमावली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्त्यव्याना कुठलाही अर्थ नाही. आता कोरोना आटोक्यात आल्याने सण उत्सवाला गर्दी होणारच असल्याचे मत त्यांनी यावेळी केले.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक शहरातील रुंगटा बेलाविस्टा येथील सुविधा क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध न्युरोसर्जेन डॉ संजय वेखंडे,हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल करवंदे, डॉ. सुरज मराठे, डॉ. संतोष घेगडमल, डॉ. विजय काकडे, डॉ. दीपक जगताप, डॉ. नवनाथ सानप, डॉ. प्रदीप जायस्वाल, डॉ. विशाल पगार डॉ. अखिल चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.