नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व तत्पर सेवा देण्याकरिता तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी महावितरणच्या नाशिक परिमंडलअंतर्गत ०२ ते ११ ऑगस्ट या दहा दिवसात “ग्राहक सेवा अभियान” राबविण्यात आले असून याअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव मंडळामध्ये एकूण २ हजार ७६८ ग्राहकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले असून तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ३ हजार ४४८ तात्काळ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तत्पर सेवेबद्दल ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तथा महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या निर्देशानुसार नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या दहा दिवसांच्या मोहिमेमध्ये तात्काळ विविध तक्रारींचे निवारण करण्यात आले असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अकृषक ग्राहकांना पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी नाशिक मंडळात २ हजार ६५५ तर मालेगाव मंडळात ७९३ अशी एकूण नाशिक जिल्ह्यात तात्काळ ३ हजार ४४८ नवीन विद्युत जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
तसेच नाशिक जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या २ हजार ७६८ तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले आहेत. या तक्रारीमध्ये प्रलंबीत विद्युत जोडणी (पेड पेंडींग), कायमस्वरूपी तथा तात्पुरता खंडीत केलेला विद्युत पुरवठा पूर्ववत करणे, विद्युत देयकाच्या नावात बदल, विद्युत भार बदल, वर्ग बदलवारी, पत्ता बदल तसेच वीज बिल दुरुस्ती अशा तथा इतर तक्रारींचा समावेश होता. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर व जगदीश इंगळे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले.
nashik mseb Consumer Service Campaign Complaints Connection