नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आई आपल्या बाळासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पेठरोड परिसरात झालेल्या या प्रकाराची संपूर्ण नाशिक शहरात चर्चा होत आहे. खासकरुन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना या मातेने एका मोठ्या धाडसाचा आदर्श निर्माण केला आहे.
दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून कचरा टाकण्यासाठी आई गॅलरीत गेली. त्याचवेळी गॅलरीचा दरवाजा हवेमुळे अचानक बंद झाला. त्यानंतर बाळापर्यंत पोहोचण्यासाठी उंच इमारतीवर चढण्याची तारेवरची कसरत आईने केल्याची घटना नाशिकमध्ये घडली. गॅलरीत अडकल्याने त्या आईने क्षणाचाही विलंब न करता लोखंडी गिरींच्या सहाय्याने तिसऱ्या मजरावरील पायऱ्यांवर उतरत तेथून पाईपच्या साहाय्याने बाळापर्यंत पोहोचल्यामुळे तिचे कौतुक होत आहे. शिवकालीन इतिहासातील हिरकणी आपल्या तान्हुल्या बाळासाठी डोंगर सहज उतरते, अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली.
तृप्ती जगदाळे- सोनाराचे कौतुक
शहरातील पेठ रोड परिसरातील तृप्ती जगदाळे- सोनार या आपल्या सोसायटीमध्ये चौथ्या मजल्यावर आपल्या बाळासह एकट्याच होत्या. नातेवाईकांकडे साखरपुडा असल्याने पती स्वप्नील हा मुलगी मृण्मयीसह तिकडे गेले होते. घरातील सर्व काम आवरत तृप्ती यांनी आपल्या बाळाला झोपवले. मात्र घरात कोणी नसल्याने त्यांनी मुख्य दरवाजा आतून बंद करून कचरा टाकण्यासाठी त्या गॅलरीत गेल्या. मात्र दुर्दैवाने एक हवेची झुळूक आली आणि अचानक गॅलरीचा दरवाजा बंद झाला. आणि तृप्ती या गॅलरीतच अडकून पडल्या.
घराचा मागील दरवाजा उघडा
आता काय करावे असा प्रश्न पडलेलाच असताना, त्यांना आठवले की घराचा मागील दरवाजा उघडा आहे. मात्र तिथे पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार होती, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, न डगमगता तेथील लोखंडी ग्रीलच्या सहाय्याने तिसऱ्या मजरावरील पायऱ्यांवर उतरल्या. तेथून पाईपच्या सहाय्याने मागील दरवाजा असलेल्या चौथ्या मजल्यावर पोहोचल्या आणि घरात प्रवेश केला. आणि ताडकन आपल्या बाळाला कवेत घेतलं, मात्र यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले…
Nashik Mother Thrilling Courage for Baby