नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत माजी आमदार नितीन भोसले यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांनी मुंबईत पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य हाती घेण्याचा निश्चय केला.
नितीन भोसले हे नाशिक पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पराभूत झाले. नाशिकच्या वरच्या भागात पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गुजरातला पळवून नेण्याचा घाट घातला गेला. या विरोधात भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच, यासंदर्भात त्यांनी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेचा प्रभाव कमी होत असल्याने आणि मनसेची राजकीय भूमिका लक्षात घेऊन भोसले यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यापुढील काळात पक्षाचे जोरदार काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिममधून उमेदवार कोण
नाशिक पश्चिम मतदारसंघाचे भोसले यांनी नेतृत्व केले आहे. याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी भोसलेंना मिळणार की हिरेंना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, महाविकास आघाडीने एकत्रितरित्या निवडणूक लढविण्याचे निश्चित केले तर पश्चिम मतदारसंघ कुणाला जाणार… राष्ट्रवादीला ही जागा मिळणार की ठाकरे गटाला की काँग्रेसला याबाबत उत्सुकता आहे.
Nashik MNS EX MLA Nitin Bhosale Join NCP Sharad Pawar