नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे व राहुल ढिकले या नाशिकच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील गंभीर प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
याचर्चेत या मुद्दयांकडे या आमदारांनी लक्ष वेधले
बळीराजा व पिकांचे नुकसान :
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.
नाशिक मधील रस्त्यांची दुरवस्था :
सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडून दळणवळण विस्कळीत झाले आहे. रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली.
सिंहस्थ विकासकामे (२०२७) :
आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आवश्यक विकासकामांना गती देणे गरजेचे आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी त्वरित निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू व्हावी, अशी विनंती केली. यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि पर्यटकांच्या सोयीसुविधा वेळेत पूर्ण होतील.
गुन्हेगारीवर नियंत्रण :
अलीकडच्या काळात नाशिक शहरात हाणामाऱ्या, खून, लुटमार व वाहनांची तोडफोड यांसारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणेची ताकद वाढवावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि अधिकाधिक पोलीस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग (व्हाया संगमनेर) :
नाशिक आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो संगमनेर मार्गे पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल, उद्योगधंद्यांना चालना मिळेल तसेच शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी देवाणघेवाण अधिक सुलभ होईल. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्याची मागणी आम्ही केली.