नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी परिसरातील मेरी सरकारी वसाहतीत एका व्यक्तीचा खुन झाला आहे. पत्नी माहेरुन घरी परतल्यानंतर घरात पची मृतावस्थेत आढळला आहे. संजय उर्फ संतु वसंतराव वायकांडे (वय ३८) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वायकांडे हे मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते.
याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धरणांची बांधणी, रचना आणि देखभालीसंबंधात कार्य करणारी महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या संस्थेचे मुख्यालय पंचवटी परिसरातील मेरी येथे आहे. या संस्थेत कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी याचठिकाणी सरकारी निवासस्थान आहे. याच वसाहतीत वायकांडे हे राहत होते. वसाहतीमधील एका खोलीत पत्नी, दोन मुलांसह वायकंडे हे गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास होते. दिपावलीनिमित्त त्यांची पत्नी आपल्या मुलांसोबत तीन दिवसांपुर्वी माहेरी गेली होती. मंगळवारी (३ नोव्हेंबर) जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली, तेव्हा ते घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
शवविच्छेदनासाठी वायकांडे यांचा मृतदेह नेण्यात आला. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर काही व्रण आढळून आले. त्यामुळे गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला असावा? अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री पंचवटी पोलिसांसह आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मेरी येथील त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. वायकंडे यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Nashik Meri Quarter Clerk Murder Crime