विशेष प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यासोबतच रुग्णालय सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत वाढ होणार आहे. त्यामुळे ही इमारत लवकरात लवकर तयार होवून त्याचा लाभ जिल्ह्याला व्हावा यासाठी इमारतीच्या कामाकाजाला गती देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयतील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाची इमारत व महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एन.राजभोज, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर विद्यापीठाचे समन्वय डॉ. संदीप गुंडरे, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, पुढील अनेक वर्षांचा विचार करुन विद्यापीठाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे कामकाज प्राधान्याने पूर्ण करुन आवश्यक तांत्रिक बाबीं व निधीची पूर्तता करावी. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्याच्या वैद्यकीय सुविधेत वाढ होणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य शासनाच्यावतीने करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे बांधकाम करतांना अनुभवी तज्ज्ञ वास्तु विशारदाची नेमणूक करावी करुन त्यांच्यामार्फत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सोयीसुविधांच्यादृष्टीने उत्कृष्ट आराखडा तयार होईल असे नियोजन करावे. महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेच्या अभ्यासाक्रमाबाबत मराठा विद्याप्रसारक संस्थेसोबत करार करण्यात आला असून तसाच करार लवकरात लवकर जिल्हा सामान्य रुग्णालयाशी करण्यात यावा, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
केंद्र सरकारमार्फत सर्व आरोग्य संस्थाना निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देखील आपल्या स्तरावरुन या प्रकल्पाच्या अनुषंगाने निधी उपलब्धीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी नव्याने तयार होणारे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम व इतर आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण ताकदीने उभे रहावे. तसेच हा प्रकल्प उभा करतांना विद्यापीठस्तरावरुन वेळोवेळी होणाऱ्या बैठका, पाठविण्यात येणारे प्रस्ताव, करण्यात येणाऱ्या कामाकाजाची संपूर्ण माहिती प्रशासनाला सादर करावी, जेणेकरुन कामकाजात काही अडचणी आल्यास प्रशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.
कुलसचिव कालिदास चव्हाण यांनी यावेळी बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती सादर केली. पदव्युत्तर वैदयकीय शिक्षणाबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाशी, नाशिक यांचेशी देखील लवकरच करार करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांना सादर केली आहे.