नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील एमबीबीएस डॉक्टरने स्वतःला विषारी औषधांची सलाईन लावत आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. डॉ. स्वप्नील पाटील असे त्यांचे नाव आहे. ते गंगापूरर रोड परिसरात राहतात. डॉ पाटील यांनी सिन्नर येथे जाऊन लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. पोलिसांना डॉ. पाटील यांची सोसाईड नोट (आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी) सापडली आहे. त्यात सर्व खुलासा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. स्वप्नील पाटील हे शनिवारी सिन्नर बसस्टँड समोरील प्रेसिडेंट लॉजमध्ये गेले. एक दिवस झाला तरी ते रुमच्या बाहेर न आल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता डॉ. पाटील हे सलाईन लावलेल्या अवस्थेत आढळून आले. यासंदर्भात लॉजच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार चेतन मोरे हे घटनास्थळी उपस्थित झाले. डॉक्टरांनी तपासणी केली असता डॉ. पाटील हे मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. पाटील यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे.
सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, डॉ. पाटील यांना लिव्हरचा आजार होता. त्यामुळे सलग काही तास त्यांना काम करणे शक्य नव्हते. सध्या नोकरीही नाही. तसेच, एमबीबीएसचे शिक्षण घेऊनही घरी बसणे शक्य नाही. मात्र, आजारपणामुळे मोठे कर्ज झाले. त्यामुळेच आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. यास कुणीही जबाबदार नाही. पत्नी, आई आणि वडिलांनी खुप साथ दिली. मात्र,माझ्या प्रयत्न आणि नशिबाने साथ दिली नाही. मी अपयशी ठरलो, असे डॉ. पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.