नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापौर सतीश कुलकर्णी यांचा महापालिकेतील अखेरचा दिवस कडू झाला आहे. महापालिकेतील महापौर पदाचा अखेरचा दिवस असल्याने आणि आगामी पंचवार्षिक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन करणे महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी महापौर सतीश कुलकर्णींसह भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाआहे.
नाशिक महापालिकेतील महापौर व नगरसेवकांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी संपला. निवडणुकीच्या तोंडावर विविध कार्यक्रमांची लगीनघाई सत्ताधारी भाजपच्यावतीने करण्यात आली. यााचअंतर्गत नाशिक महापालिकेतील शेवटचा दिवस असल्याने महापौर कुलकर्णी यांनी दोन भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यात आडगावच्या ट्रक टर्मिनस येथे मल्टीलॉजिस्टिक पार्कचे भूमीपूजन हा कार्यक्रम सकाळी घेण्यात आला. तर, नमामी गोदा या प्रकल्पाचे भूमीपूजन आणि पर्यटक मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन हे दोन कार्यक्रम रविवारी सायंकाळी गोदाघाटावर घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सायंकाळच्या या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नाही. तरीही कार्यक्रम आयोजन करण्यात आल्याने माजी महापौर कुलकर्णी यांच्यासह आयोजक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, नाना शिलेदार, विजय साने, लक्ष्मण सावजी, किरण गायधनी यांच्या विरोधात पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाला पोलिस आयुक्तांची नसलेली परवानगी, वाद्य वाजविण्यास सहाय्यक आयुक्तांची नसलेली मंजुरी आणि कार्यक्रमाचे आयोजन करून गर्दी जमविल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे झालेले उल्लंघन म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाचीचाही प्रकार घडला होता.