नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी गंगापूर रोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय व उद्यान विषयक कामांची पाहणी केली.
महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे ७.५ एकर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून, त्यामध्ये नाशिककर नागरीकांसाठी विविध आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत.
या प्रकल्पात ॲडव्हेंचर पार्क, ॲम्पी थिएटर, ई-लायब्ररी, अभ्यासिका, महिलांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय हॉल, लँडस्केपिंग आणि कारंज्यांसह अत्याधुनिक उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे. विशेषतः, नाशिकमधील सर्वात मोठे ॲडव्हेंचर पार्क याठिकाणी उभारले जात आहे.
सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककर नागरीकांच्या मनोरंजनासाठी तसेच पर्यटनासाठी एक हक्काचे ठिकाण निर्माण होणार असून आबाल वृध्द तसेच तरुणाई वर्गासाठी वेगवेगळया प्रकारच्या सोई सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या जात आहे. प्रकल्पस्थळी पाहणी केल्यानंतर आयुक्त खत्री यांनी विविध सूचना देत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, अनिल गायकवाड, उपअभियंता नितीन राजपूत, नितीन धामणे, वसंत ढुमसे, प्रशांत बोरसे, किरण बोडके यासंह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.