नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक ग्रामीण पोलिस दलात मनमाड येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह सासू आणि सासऱ्यांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नी, सासू आणि सासरे हे तिघे जखमी झाले आहेत. सूरज देविदास उगलमुगले असे या पोलिसाचे नाव आहे. तर, पत्नी पूजा, सासरे निवृत्ती सांगळे आणि सासू शीला सांगळे यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उगलमुगले हा मनमाड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्याची सासूरवाडी ही सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील आहे. पत्नीवरील चारित्र्याचा संशय आणि सासूरवाडीकडून पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने उगलमुगले याने पत्नी, सासू आणि सासरे यांच्यावर थेट चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता झाली. या घटनेत तिघांच्या मानेवर, पोटावर, पाठीवर अशा शरीराच्या विविध भागावरर गंभीर वार करण्यात आले. त्यामुळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने तिघांना दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, त्यांना पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पत्नी पूजा (वय २५), सासरे निवृत्ती सांगळे (वय ५०) आणि सासू शीला सांगळे (वय ४०) यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगळे यांनी उगलमुगले विरोधात यापूर्वीच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी दखल न घेतल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, अद्याप सूरज उगलमुगले यास अटक करण्यात आलेली नाही.