नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी उन्हाळ्यात ज्या आंबा महोत्सवाची वाट पाहतात त्याची अखेर घोषणा झाली आहे. कोकण पर्यटन संस्थेच्यावतीने हा महोत्सव आयोजित केला जातो. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या महोत्सवाकडे नाशिककरांचे डोळे लागलेले असतात. आता हा महोत्सव पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
नाशिककरांना नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा उपलब्ध व्हावा या एकमेव उद्देशाने कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे दि. १८ एप्रिल पासून पिनॅकल मॉल, त्रंबक नाका येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
यंदाचा महोत्सव हा संस्थेतर्फे आयोजित सलग १६ वा आंबा महोत्सव असून महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचेच स्टॉल या ठिकाणी असतात व आंबा हा केवळ नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेलाच असेल. याच बरोबर कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा या पासून बनविलेला विविध प्रकारचा कोकणमेवा महोत्सवात विक्रीस उपलब्ध आहे. तसेच निसर्गरम्य कोकणातील पर्यटन स्थळांची माहिती मिळेल. कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेशवर इ. ठिकाणाहून शेतकरी महोत्सवात भाग घेणार आहेत, अशी माहिती आपला विश्वासू संचालक दत्ता भालेराव
यांनी दिली आहे.
यंदाचा आंबा महोत्सव याठिकाणी
उद्घाटन : मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३
वेळ : स. १०.०० वा
स्थळ : पिनॅकल मॉल, त्रंबक नाका नाशिक.
संपर्क : ०२५३ – २३१३३६८ / ९६८९०३८८८०
Nashik Mango Festival Dates Declared