मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादी सायकल, मोटरसायकल, दागदागिने, पैसे यांची चोरी झाली तर आपण समजू शकतो. परंतु एखादा रस्ता चोरीला गेला तर! असे कसे शक्य आहे? परंतु अशी घटना घडली होय. एका गावातील रस्ता चोरीला गेल्याची फिर्याद ग्रामस्थांनी दाखल केली असून आता याबाबत पोलीस देखील विचारात पडले आहेत.
खरे म्हणजे मराठीमधील अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या एका चित्रपटात विहीर चोरीला जाते, अशी घटना दाखवली आहे. अशाच प्रकारची घटना मालेगाव तालुक्यात घडली परंतु खरेच रस्ता चोरीला गेला का, नाही ? तर खरे म्हणजे रस्ताच बनविला नव्हता. मात्र यामध्ये काहीतरी गौडबंगाल आहे एवढे मात्र नक्की.
मालेगाव शहर आणि परिसरात चोरीच्या घटना नेहमीच होत असतात दुचाकी, दागिने, शेतीमाल जनावरे, कार आदी चोरीला गेल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडे गुन्हे दाखल झाले आहेत. इतकेच नव्हे तर भंगार चोरीच्या गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र नुकतेच मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तालुक्यातील टोकडे येथील दोन किलोमीटरचा रस्ता चोरीला गेल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे आता थेट चोरीचा रस्ता शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
विशेष म्हणजे याप्रकरणी पोलीस ठाण्यात विठोबा ग्यानद्यान यांनी फिर्याद दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, टोकडे येथे गेल्या तीन महिन्यांपूर्वी मुलभूत विकास निधीतून गावांतर्गत दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला होता. सदर रस्त्याचे काम कागदोपत्री पूर्ण झाल्याचा दाखला देखील अधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदार सुजन पगार यांचा रस्ता कामासाठी खर्च झालेला १७ लाख ८४ हजार ७८१ रुपयांचे बिल देखील त्यांना अदा करण्यात आले आहे. मात्र रस्ता काम पूर्ण होवून अवघा तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतांना रस्ता चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे.
महत्त्वाची बाब अशी की, फिर्यादी द्यानद्यान यांनी संपूर्ण गावात फेरफटका मारुन रस्त्याचा शोध घेतला मात्र त्यांना रस्ता गावांतर्गत कुठेही मिळून आला नाही. अखेर त्यांनी हताश होवून मालेगाव तालुका पोलीस ठाणे गावातील रस्ता चोरीला गेल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तसेच रस्ता चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. रस्ता पूर्ण झाल्याप्रकरणी अभिलेखात नोंद देखील करण्यात आली आहे. शाखा अभियंता, उपअभियंता यांनी गावात जागेवर येवून पडताळणी करीत प्रशासकीय मान्यतेनंतर संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे.
फिर्यादी ग्यानद्यान यांनी गावात येवून रस्त्याचा शोध घेतला. मात्र रस्ता चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चोरीला गेलेला रस्ता शोधून आणणाऱ्याला रोख स्वरुपात एक लाख रुपये बक्षिस देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सदरचा चोरीला गेलेला रस्ता शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता खरोखर रस्ता सोडला तर त्याला बक्षीस मिळणार आहे त्यामुळे गावात याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
Nashik Malegaon Village Road Lapse Citizen Complaint