नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर संपन्न होणार आहे. या महाशिबिरासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणांनी महाशिबिराची जय्यत तयारी केली आहे.
नाशिक येथील सिटी बस लिंक डेपो शेजारील तपोवन मैदान येथे होणाऱ्या या महाशिबिरास जवळपास ५० हजार महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत/लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन केले आहे. या शिबिराच्या ठिकाणी लाभार्थींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वतः शिबिर स्थळावरून झालेल्या तयारीची पाहणी करत आढावा घेतला आहे. यामध्ये मान्यवरांची बैठकव्यवस्था, वीजपुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणाऱ्या महिला व अन्य लाभार्थींची वाहतूक व्यवस्था, कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाईल स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सूत्रसंचालन, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी स्क्रीन्स आदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला आहे.