नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भगवान महेश, भगवान महावीर यांनी दानाचे महत्व अधोरेखित केले आहे. समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी माहेश्वरी समाजाने नेहमीच योगदान दिले आहे. या माध्यमातून समाजसेवा आणि राष्ट्र सेवा केली आहे. या समाजाला सेवेचा वारसा लाभला आहे. सेवेचा हा वारसा नवी पिढी कायम ठेवेल, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी येथे व्यक्त केला.
नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा, डॉ. श्रीकांत करवा फाऊंडेशन विद्यालय, कॉलेज, विद्यार्थी भवन, श्रद्धाश्रम, रुग्णालय भूमिपूजन आणि आभार सोहळा आज दुपारी पंचवटी परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. बिर्ला बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, डॉ. श्रीकांत करवा, अंजली बिर्ला आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच फाऊंडेशनला देणगी देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
श्री. बिर्ला म्हणाले की, माहेश्वरी समाजाने स्वातंत्र्य आंदोलनात योगदान दिले आहे. त्यांनतर नवभारताच्या निर्मितीत योगदान दिले. त्यातून सामजिक, आर्थिक परिवर्तन घडविले. कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर हा समाज मदतीसाठी पुढे असतो. नव्याने सुरू होणारे विद्यालय, महाविद्यालय, इस्पितळाचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे. त्यामुळे समाजाच्या विकासाला हातभार लागणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जागतिक पातळीवर आपला नावलौकिक उंचावत आहे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पात्र विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.