इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिका आस्थापनावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे आस्थापनेवरील श्रीमती महुओं बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) यांची प्रतिनियुक्तीने अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे आता शिवसेना नाशिक महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी आक्षेप घेत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्तांच्या निर्णयाविरोधात तक्रार दिली आहे. याअगोदर मनपाच्या २९ अभियंत्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देऊन परसेवेतील बॅनर्जी यांना पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता म्हणून रुजू करुन घेऊ नये अशी भूमिका घेऊन विरोध केला होता. पण, त्यांच्या विरोधाला न जुमानता आयुक्तांच्या सूचनेनंतर बॅनर्जी यांनी पदाचा अतिरिक्त पदभार स्विकारला. त्यानंतर तिदमे यांनी आता तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, शासन निर्णय क्रमांक नामपा-२०२३/प्र.क्र.-११/नवि-२५/मंत्रालय, मुंबई. दिनांक ०६ जुन, २०२३ अन्वये नाशिक महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमांना मा. शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामध्ये पृष्ठ क्र. १९ वरील कार्यकारी अभियंता (स्थापत्य) या पदाकरीता पदोन्नतीकरीता अर्हता विहित करण्यात आलेली आहे.
पदोन्नतीने उमेदवार उपलब्ध न झाल्यास, उमेदवार उपलब्ध होईपावेतो शासनाकडील समकक्ष पदावरील किमान ०५ वर्षाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करता येईल. त्याचप्रमाणे शासन निर्णय क्रमांक नामपा-२०२३/प्र.क्र.-११/नवि-२५/मंत्रालय, मुंबई दिनांक ०६ जुन, २०२३ अन्वये शहर अभियंता / अधिक्षक अभियंता (भु.ग. यो.), कार्यकारी अभियंता, उपअभियंता या पदाकरीता पदोन्नतीने नियुक्ती देणेकरीता विहित करण्यात आलेली शैक्षणिक व अनुभवाची अर्हता नाशिक महानगरपालिकेतील कार्यरत अभियंते हे दिनांक २६/११/२०२४ रोजी पासुन धारण करीत आहे. यास्तव महानगरपालिकेतील उपरोक्त संवर्गातील रिक्त पदावर शासनाकडील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबतचा प्रश्न उद्भवत नाही.
आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २८/०१/२०२५ रोजी झालेली कर्मचारी निवड समितीच्या बैठकीच्या मान्यतेनुसार शहर अभियंता / अधिक्षक अभियंता (भु.ग. यो.) कार्यकारी अभियंता, उपअभियंता या पदांवर पदोन्नतीने नियुक्ती देणेबाबत मान्यता देऊन शिफारस करण्यात आलेली आहे. तथापी पदोन्नतीने नियुक्ती न देता संदर्भक्र. ०२ अन्वये श्रीमती. महुओं बॅनर्जी, कार्यकारी अभियंता यांच्या सेवा उपलब्ध करुन देणेबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना आयुक्त तथा प्रशासक महोदया यांनी नियमाचा भंग करुन विनंती केली आहे.
नाशिक महानगरपालिकेमध्ये पदोन्नतीस पात्र असलेले अभियंता सुमारे २५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासुन सेवेत आहेत. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या अभियंता यांना भौगोलिक परिस्थीतीची संपूर्ण जाण आहे. उपरोक्त कालावधीमध्ये पाणी पुरवठा व मलःनिस्सारण विभागाकडील विविध प्रकल्पांचे यशस्वीरित्या नियोजन करुन प्रकल्प पूर्ण करण्यात येऊन कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत असे तक्रारीत म्हटले आहे.