नाशिक – राज्यभरात राबविण्यात येत असलेली “मिशन कवच कुंडल” ही मोहीम नाशिक शहरातही महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. मिशन कवच कुंडल ही मोहीम ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे .नाशिक शहरातील १३ लाखापेक्षा अधिक लसीकरण लाभार्थ्यांपैकी ७२ टक्के नागरिकांना लसीचे पहिले डोस देण्यात आलेले आहेत. शहरात ३३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक शहरातील ३० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येक आरोग्य केंद्राची अंर्तगत विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरात १५२ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु आहे. मनपाच्या सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता आरोग्यसेविका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस हे स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहेत.तसेच या मिशन कवच कुंडल मोहिमेसाठी सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेच्या वतीने नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करत आहे.
संस्थेच्या वतीने लसीकरण मोहिमेसाठी शहरात विविध ठिकाणी वाहनाद्वारे जनजागृती केली जात आहे. कोरोनाला थोपवायचे असेल तर लसीकरणाची मोहीम युद्ध पातळीवर राबवणे गरजेचे आहे. याच कारणामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नाशिक महानगरपालिका वेगवगेळ्या मोहिमा राबवत आहे. दरम्यान, नाशिक शहरातील ७२ टक्क्यांच्या वर नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. ज्या नागरिकांनी कोविशील्ड लसचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी ८४ तर ११२ दिवसापर्यंत दुसरा घेणे आवश्यक आहे व ज्या नागरिकांचे कोव्हॅसिन लस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांनी २८ तर ४२दिवसापर्यंत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे .अश्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी असलेल्यांनी लवकरात लवकर आपले दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे,या मोहिमेअंतर्गत १00% नागरिकांचा पहिला डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. पालिका क्षेत्रातील आतापर्यंतचे एकही डोस न घेतलेल्या नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावरती जाऊन आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मा.महापौर सतिश(नाना)कुलकर्णी,मा .आयुक्त कैलास जाधव,उपमहापौर भिकुबाई बागुल,स्थायी समिती सभापती गणेश गिते,सभागृह नेते कमलेश बोडके,विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते,सर्व गटनेते, नगरसेवक,सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.