मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परसेवेतील अधिकाऱ्यांपेक्षा नाशिक महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पदोन्नतीने स्थानिक अधिकाऱ्यांना कामाची संधी मिळावी या मागणीसाठी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
सेवा शर्तीच्या पात्रतेच्या निकषानुसार आणि पदोन्नती समितीने शिफारस केलेल्या नाशिक महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांना पदोन्नती डावलून परसेवेतील अधिकाऱ्यांना महापालिकेत आणले जात असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच, शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत, याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि नाशिक महानगरपालिकेतील प्रशासनिक कार्यक्षमता सुधारेल, असा विश्वास प्रविण (बंटी) तिदमे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी, शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे उपस्थित होते.