नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्टॅन्डचे आधुनिकिकरण व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी महामंडळाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली. महामार्ग बस स्टॅडचे आधुनिकीकरण करण्यासाठी महामंडळ प्रशासन सकारात्मक असून लवकरच प्रायव्हेट पार्टनर तत्वावर आधुनिकीकरण होणार आहे.
महामार्ग बस स्थानकाचे लवकरच आधुनिकरण होणार असून यामध्ये महामंडळाचे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, मॉल, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वातानुकूलित वेटिंग रूम, पुरुष आणि महिला प्रवाशांसाठी स्वंतत्र रांगा,शौचालये आदी आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.आधुनिकीकरणामुळे महामार्ग बसस्टॅडचे रुपडे पुर्णतः बदलणार असून नव्याने झळाळी मिळणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
मुंबई पुणे पाठोपाठ नाशिक हे झपाटयाने विकसित होणारे शहर आहे.मुंबई – पुणे -नाशिक हा विकासासाठीचा सुवर्ण त्रिकोण आहे.वणी येथील सप्तशृंगी माता मंदिर,त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजा मंदिर,शहरातील काळाराम मंदिर,तपोवन,पंचवटी आदी प्रख्यात धार्मिक स्थळे शहर परिसरात असल्याने धार्मिक पंढरी अशी देशभरात नाशिकची ओळख आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोकण, जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, तुळजापूर, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणांहून रोज नाशिक शहरात बसने सुमारे वीस हजार प्रवाशी येत असतात.यातूनच शहरातील महामार्ग बसस्टॅडच्या अधुनिकीकरणाचा विषय पुढे आला आहे.
महामार्ग बस स्टँड आधुनिकरण व्हावे यासाठी शहरातील नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांकडून आलेल्या सूचनांची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी मंत्रालयात एसटी महामंडळाचे राज्याचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली. महामार्ग बसस्टॅडच्या आधुनिकीकरणासाठी तयार केलेले डिझाईन वजा नकाशा यावेळी गोडसे यांनी जैन यांच्यासमोर सादर केला. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीकडून महामार्ग बसस्थानकाचे विकसन करून प्रायव्हेट पार्टनर (पीपीपी) तत्वावर चालविणे सहज शक्य होणार असल्याचे खा.गोडसे यांनी जैन यांच्या लक्षात आणून दिले.
जैन यांना गोडसे यांचा प्रस्ताव भावल्याने त्यांनी लगेचच प्रस्तावास सकारात्मकता दर्शविली.आपला प्रस्ताव योग्य असून बसस्थानकाच्या अधिनिकीकरणासाठी लवकरच योग्य ते पावले उचलणार असल्याची ग्वाही जैन यांनी गोडसे यांना दिले आहे.सरकार आणि प्रशासनाच्या सकारात्मक भुमिकेमुळे आता लवकरच महामार्ग बसस्थानकाचे रूपडे पालटणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.
Nashik Mahamarga Bus Stand Renovation Proposal