नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील समाज भवनाच उपयोग समाजातील मुला-मुलींच्या राहण्याची सोय,वयोवृद्ध समाजबांधव यांना हक्काची जागा, समाजातील विविध कार्यक्रमांची सोय, तसेच इतर महत्वाच्या सभा मिटींगसाठी तर उपयोगी ठरणार असून हे समाजभवन लोहार समाजाच्या विकासाचं महत्वाचं केंद्र बिंदू ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक येथे लोहार सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व नाशिक ब्रिगेड लोहार एकसंघ ‘लोहार समाज भवन’ भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशांत लोहार, सतीश सूर्यवंशी, सी. एम कुकावलकर, रविंद्र राठोड, किरण जाधव, तुळशीदास राठोड, यतीन पवार, प्रशांत लोहार, नितीन लोहार, गिरीश लोहार, किरण जाधव, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची कवाड खुली केली. त्याचा परिणाम म्हणजे जो समाज भटके जीवन जगत होता शिक्षणापासून वंचित होता. त्या समाजातील मुलं आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय यामुळे स्थिर-स्थावर होताना दिसत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी साडेसात हजार वेगवेगळ्या जाती चार वर्गात विभागून दिल्या. बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काही लोक आरक्षण समाप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. राजकारणातील आरक्षण आपल्या हातून गेलं तर शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण देखील आपल्या हातून जाईल. आरक्षण संपविण्याचा प्रयत्न काही लोक प्रयत्न करत आहेत यासाठी सर्व ओबीसी घटकांनी एकसंघटी राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिक शहरात हे बहुउपयोगी असे भवन उभे राहत आहे. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील बांधवांना याचा फायदा होईल. या ठिकाणी विविध समाजउपयोगी कार्यक्रम पार पडतील.इतर समाजातील बांधवांनी देखील याचा आदर्श घ्यावा. लोहार समाज बांधवांच्या ज्या मागण्या असतील त्या शासन दरबारी पाठपुरावा करून त्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले.