नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कल्याण-नगर रस्त्यावरील माळशेज घाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या नाशिकच्या गिर्यारोहकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. किरण काळे (५०, रा. टाकळी रोड, नाशिक) असे मृत गिर्यारोहकाचे नाव आहे. काळे हे भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) विकास अधिकारी (डेव्हलपमेंट ऑफिसर) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बाराच्या सुमारास नाणेघाट परिसरातील चोरदरी येथे हा अपघात झाला. रात्री उशिरा काळे यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आले. काळे यांच्यासोबत आलेले इतर गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. किरण काळे यांनी अनेक अवघड चढाई पूर्ण केल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांच्यासह नाशिक येथील बारा गिर्यारोहकांचा जत्था रविवारी सकाळी माळशेज घाटावर ट्रेकिंगसाठी गेला होता. दुपारी घाटमाथ्याकडे जात असताना चोरदरी मार्गावर पाच जण दरीत अडकले. दरम्यान, तोल गेल्याने दरीत पडून काळे यांचा मृत्यू झाला. या संदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल, वन आणि स्वयंसेवी संस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या शोधानंतर काळे यांचा मृतदेह सापडला आहे.
काळे यांच्या निधनामुळे नाशिकच्या गिर्यारोहण क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त होत आहे. त्यांना गिर्यारोहणाचा उत्तम अनुभव होता. त्यांनी जवळपास १०० ठिकाणी गिर्यारोहण पूर्ण केले होते. ते केके नावाने परिचीत होते. गिर्यारोहण करतानाच त्यांचे निधन झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाहीय. अतिशय मनमिळावू त्यांचा स्वभाव होता. एलआयसीशी अनेक एजंट जोडणे, अनेकानेक व्यक्तींना विम्याचे संरक्षण देणे यासाठी ते आग्रही होते. त्यात त्यांना मोठे यश मिळाले होते. एलआयसी, गिर्यारोहण यासह विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
Nashik LIC Officer Death while Trekking in Malshiras Ghat Area