नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवसेंदिवस चोरीच्या घटना सातत्याने समोर येताना दिसतात. मात्र, असे असले तरी प्रामाणिकपणा सुद्धा जीवंत असल्याचा प्रत्यय नाशकात समोर आला आहे. एलजी कंपनीत सर्व्हिस इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने वॉशिंग मशीन दुरुस्त करत असताना सापडलेली सोन्याची चैन तात्काळ संबंधित मालकास परत केली. जेव्हा कंपनीला ही गोष्ट समजली तेव्हा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवरून या कर्मचाऱ्याचे कौतुक करत आभार मानले.
तुषार बाजीराव सूर्यवंशी असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते मूळ मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील आहेत. सध्या ते नाशिक शहरातील मखमलाबाद परिसरात वास्तव्यास आहेत. घटनेची अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील एक वकील नाशकात वास्तव्यास असून त्यांचे नाव अॅड वसंतराव तोरवणे असे आहे.
ते कुटुंबासह शरणपूर रोड परिसरात राहतात. त्यांचे वॉशिंग मशीन खराब झाल्यामुळे तुषार हे त्यांच्या घरी वॉशिंग मशीन दुरुस्तीसाठी गेले होते. वॉशिंग मशीनची दुरुस्ती करत असताना त्यास एका पाईपमध्ये अडकलेली सोन्याची चैन दिसून आली.
त्याने तात्काळ अॅड तोरवणे यांना फोन करत तुमची काही वस्तू गहाळ झाली आहे का? याबाबत विचारणा केली. यानंतर दोन वर्षांपूर्वी आमच्या घरातून सोन्याची चैन गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना घरी बोलवून त्यांची सोन्याची चैन कर्मचारी सूर्यवंशी यांनी परत केली. एक दोन नव्हे तब्बल सात तोळ्यांची सोन्याची चैन परत मिळाल्याने तोरवणे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झालेला होता. त्यांनी कर्मचाऱ्याचे आभार मानत प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
आमचे कर्मचारी तुषार सूर्यवंशी यांनी जे कार्य केले यामुळे कंपनीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा नाशिकच्या सबंध टीमचे कंपनीकडून अभिनंदन करण्यात आले. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुषार यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचा कंपनीच्या वतीने सन्मान करण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मी शेतकरी कुटुंबातील आहे. माझ्या आई वडिलांसह आम्ही दोघे भावंड शेतात कष्ट करून पुढे आलो आहोत. सोन्याची चैन त्यांच्याही कष्टाच्या पैशांनीच घेतलेली असेल; या भावनेतून त्यांना तात्काळ चैन परत करण्याचे मी ठरवले व त्यांना घरी बोलवून सोन्याची चैन परत केली.
– तुषार सूर्यवंशी, सर्व्हिस इंजिनियर, एलजी कंपनी नाशिक
Nashik LG Company Service Engineer 70 Gram Gold Chain