नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गैरवर्तन करणारे अॅडव्होकेट लिलाधर मुरलीधर जाधव यांची सनद सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. तशी माहिती नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांनी दिली आहे.
अॅड ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडव्होकेट लीलाधर मुरलीधर जाधव या वकीलाविरुद्ध बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे नाशिक बार असोसिएशनने गैरवर्तनाची तक्रार केली होती. त्याचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानुसार सदर वकीलाची सनद ही सहा महिन्यांकरीता रद्द करण्यात आलेली आहे. याचा अर्थ त्यांना सहा महिन्यापर्यंत कुठल्याही न्यायालयामध्ये वकिली करता येणार नाही. तसेच, वकील, न्यायाधीश व न्यायालयीन यंत्रणा यांच्याबाबत सध्या सुरू असलेले व्हॉट्सअॅप मेसेजेस आणि इतर बदनामीकारक मजकूर त्यांच्यामार्फत असाच चालू राहिला तर याहीपेक्षा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा या निकालपत्रात देण्यात आलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून जाधव हे वकील संघाचे पदाधिकारी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य तसेच न्यायाधीश यांच्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर व्हॉट्सअप ग्रुप मध्ये प्रसिद्ध करीत होते. त्यामुळे सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरच्या disciplinary committee मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे चेअरमन ॲड गजानन चव्हाण, ॲड पासबोला, ॲड अन्सारी या त्रिसदस्यीय कमिटीने सदरचा निकाल दिलेला आहे. सदर निकालाबाबतची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांना पुढील कारवाई करता कळविण्यात आली आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.