नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव येथील रेल्वे स्टेशन अत्याधुनिक होणार आहे. लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा आणि द्राक्ष निर्यात करतो. साहजिकच यासाठी रेल्वेचा वापर करण्यात येतो. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, नाशिक आणि मनमाड हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहेत. परंतु आता निफाड तालुक्यातील लासलगाव रेल्वे स्थानकालाही एक वेगळाच दर्जा प्राप्त होणार आहे. कारण लासलगाव रेल्वे स्थानकाचे रंग -रूप लवकरच पालटणार आहे. विशेष म्हणजे या कामाचा शुभारंभ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
अमृत भारत स्टेशन योजना
देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकरण होणार आहे. त्याचे उद्घाटन १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणार आहेत. लासलगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश झाल्याने येत्या काही दिवसात या रेल्वे स्थानकात सर्व प्रकारच्या सोयी – सुविधा निर्मिती करण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. वर्षभरात लासलगाव रेल्वे स्थानकाचे रूप पूर्णतः बदलणार आहे. यामुळे शहराच्या आर्थिक भरभराटीस चालना मिळणार आहे.
पाठपुरावा कामी
विशेष म्हणजे शेतमाल निर्यातीसाठी शेतकऱ्यांना मोठी सुविधा प्राप्त होणार आहे विशेषता कांदा आणि द्राक्षाची निर्यात अधिक सोयीची होऊ शकते. लासलगाव स्थानकाचा यात समावेश करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा लासलगाव मंडल अध्यक्ष डी. के. जगताप, सुवर्णा जगताप यांनी वेळोवेळी केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री डॉ. भारती पवार व रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डिआरएम पांडेय यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दीर्घकालीन दृष्टिकोनातून काही रेल्वे स्थानकांचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे.
हे लक्षात घेऊन नियोजन
येत्या वर्षभरात लासलगाव रेल्वे स्थानकाला नव्याने झळाळी मिळणार असून रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर विशेष सुविधा मिळणार आहे. विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. या योजनेमुळे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामुळे या रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्थानकांचा विकास करण्यावर यात भर दिला जाणार आहे. स्थानकांचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करून सुविधांचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे.
या मिळतील सुविधा
प्रामुख्याने प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. यात प्रामुख्याने नविन बुकिंग ऑफिस, स्थानक परिसराचे सुशोभीकरण, न्यू फूट ओव्हर ब्रीज लिफ्ट सह होणार आहे . तसेच प्लॅटफॉर्म कोच इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक बोर्ड डिस्प्ले, स्थानक प्रवेशद्वारांचा विकास करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी प्रतीक्षागृहांची उभारणी, अंतर्गत रचनेत सुधारणा, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, कांदा लोडिंग काँक्रिटीकरण आदि विकास कामे करण्यात येणार आहेत. तसेच स्थानक परिसरातील वाहतूक पार्किंगची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. प्रामुख्याने प्रवासी केंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. रेल्वे स्थानकाच्या बाह्यरुपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत, अशी माहिती डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, राजेंद्र चाफेकर, नितीन शर्मा आदी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.