नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कझाकिस्थान येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय (आयएसपी) प्रेस कामगार नेते, वर्क्स कमिटीचे सदस्य डॉ चंद्रकांत हिंगमीरे यांचा मुलगा ओंकार चंद्रकांत हिंगमीरे याचा इमारती वरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
डॉ चंद्रकांत हिंगमीरे यांना दोन मुलं असून मोठा मुलगा यश हा एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून लंडन येथे एमएसचे शिक्षण घेत आहे.तर दुसरा मुलगा ओंकार हा कझाकिस्थान येथे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षासाठी शिकत होता. तो कॉलेजच्या जवळच एका इमारती मध्ये सहाव्या मजल्यावर पाच नाशिक येथील मित्रांसह एकत्र राहत होता. ५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सहाव्या मजल्यावरून पडून ओंकारचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच प्रेस कामगार नेते, यांनी डॉ हिंगमीरे यांच्या निवासस्थानी धाव घेतली, कामगार नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ओंकार यांचा मृतदेह नाशिकला आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला.
ओंकार ७ जूनला नाशिकला येणार होता
ओंकार हा चौथ्या वर्षाच्या निकालात तो प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे सर्वच आनंदी होते. काही दिवसात सुट्टी लागणार असल्याने ७ जून रोजी तो नाशिक येथे घरी येणार होता. त्याचे विमान तिकीटही बुक झाले होते. पण, ५ मे रोजीच ही दुर्दैवी घटना घडली.