नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठाराव मंजूर झाला. १८ पैकी १५ सदस्यांनी अविश्वास ठरावावर मतदान केले. भाजपचे शिवाजी चुंभळे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन ३ मार्च रोजी हा ठराव दाखल केला होता त्यानंतर आज कृऊबाच्या प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व बाजार समिती सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. या सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला. देविदास पिंगळे यांचा कारभार मनमानी असून त्याविरोधात संचालकांनी हा ठराव मंजूर करुन विरोध दर्शवला होता.
या सभेत सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली. पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर १० संचालकांना सहलीसाठी परदेशात पाठवले होते. ते सोमवारी सायंकाळी नाशिकला परतले. त्यानंतर त्यांनी आज विशेष सभेत भाग घेतला.
गिरीश महाजन यांच्यावर केले होते हे आरोप
पिंगळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणारे बहुतांश सदस्य त्यांच्या पॅनलमधून निवडून आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा ठराव दाखल केल्यानंतर देविदास पिंगळे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ते म्हणाले होते की, गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होणार असल्याने यंत्रणा हातात घ्यायला सुरुवात केली आहे. पोलिस बंदोबस्तात बाजार समितीच्या संचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. प्रत्येक संचालकांना ५० लाख रुपये देऊन फोडले. सर्व घडामोडी मागे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप देविदास पिंगळे यांनी केला होता.