नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रत्येक खेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे. खेळाच्या माध्यमातून शारीरिक क्षमतेचा कस लागतो. त्यातून व्यायाम होतो. त्यामुळे प्रत्येक तरुणाने व्यसनांपासून दूर राहत अभ्यासाबरोबरच व्यायाम करावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीण्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी आयोजित पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज सायंकाळी स्व. मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार सीमा हिरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, विभागाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक अनिल गावित, क्रीडा विभागाच्या उपसंचालक श्रीमती साळुंखे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष संजय पाटील, क्रीडा प्रशिक्षक वीरेंद्र सिंह आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघाला बक्षीस वितरण करण्यात आले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात कबड्डी, व्हॉलिबॉल आणि कुस्तीमध्ये पुणे विद्यापीठ आणि राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही वर्षांत पारंपरिक खेळ मागे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री श्री. लोढा यांनी पुढाकार घेत आयोजित केलेला पारंपरिक खेळांचा कुंभ उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. विद्यार्थांनी व्यसनांपासून दूर राहत व्यायामाकडे लक्ष द्यावे. व्यायामाकडे कल वाढला की व्यसनापासून दूर रहाल, असेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करुन दिली आहे. खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून देशाला अनेक खेळाडू मिळाले आहेत, असेही मंत्री श्री. महाजन म्हणाले.
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने कमी कालावधीत स्पर्धेची केलेली तयारी कौतुकास्पद आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी देशी खेळ खेळण्याचा आनंद घेतला. त्यासाठी मंत्री श्री. महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. आगामी काळात हा क्रीडा कुंभ व्यापक स्तरावर घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. संचालक श्रीमती सरदेशमुख यांनी प्रास्ताविक केले. सहसंचालक श्री. गावित यांनी आभार मानले.
सामंजस्य करार
मंत्री श्री. महाजन, मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि एचएएल, नाशिक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी एचएएलचे अधिकारी उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर विभागातील आठ संस्थांना ‘एचएएल’ ऑनलाईन ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
