नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकहून चार शहरांसाठी दिली जाणारी विमानसेवा बंद करीत असल्याची घोषणा अलायन्स एअर कंपनीने केली असतानाच आणखी एक बाब समोर आली आहे. खासगी कंपनी असलेल्या स्टार एअरने नाशिक-बेळगाव ही सेवा बंद केली आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी नाशिकचे विमान पळविण्यात आल्याचे समोर येत आहे.
ओझर विमानतळावरुन केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू झाली. त्यात स्टार एअर या कंपनीकडे नाशिक-बेळगाव हा मार्ग मंजूर करण्यात आला. प्रारंभी या कंपनीने सोमवार ते शनिवार असे सात दिवस सेवा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कंपनीने एक दिवसाआड म्हणजेच आठवड्यातून तीन दिवस सेवा सुरू केली. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र, त्याचवेळी कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा बंद पडली. अखेर भाजपच्या बड्या नेत्याने आपले राजकीय वजन वापरुन कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी यत्न केले. याचाच एक भाग म्हणून नाशिकहून दिली जाणारी बेळगाव सेवा २ महिन्यांसाठी बंद करण्याची घोषणा केली. नाशिकसाठीचे विमान थेट कोल्हापूरला नेण्यात आले. आणि याच विमानाद्वारे आता कोल्हापूर-मुंबई ही सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे, याचा कुठलाही गंध नाशिकच्या राजकीय नेत्यांना वा अन्य सूज्ञ जणांना लागलेला नाही.
नाशिकला कार्यरत असलेली सेवा बंद करुन अन्य शहरातून सेवा सुरू करण्याने नाशिकवर मोठा अन्याय झाला आहे. मात्र, त्याचे कोठलेही सोयरसूतक राजकीय नेते, पदाधिकारी, मंत्री वा अन्य कुणालाही नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अलायन्स एअर सोबत स्टार एअरची सेवाही कायमस्वरुपी बंद होणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व कारभारात नाशिकचे मोठे नुकसान होत असून त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
Nashik Kolhapur Air Service Stop