नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी उन्हाळ्यात नाशिककर ज्या महोत्सवाची आतूरतेने वाट पाहत आहेत त्या आंबा महोत्सवाची घोषणा झाली आहे. नाशिककरांना नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा या महोत्सवात उपलब्ध होतो. कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे येत्या गुरुवारी (२८ एप्रिल) पासून सीबीएस येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात आंबा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे हस्ते आणि जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कोकण पर्यट विकास संस्थेचे संचालक आणि आंबा महोत्सवाचे आय़ोजक दत्ता भालेराव यांनी सांगितले की, संस्थेतर्फे १४ वा आंबा महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॅाल्स. आंबा हा केवळ नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेलाच असेल. याचबरोबर कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ,आवळा यापासून बनविलेला विविध प्रकारचा कोकणमेवाही महोत्सवात विक्रीस उपलब्ध होणार आहे.
कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेश्वर, दापोली आदी ठिकाणचे शेतकरी या महोत्सवात भाग घेणार आहेत. वास्तविक या वर्षीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने आंब्याचे प्रमाण कमी असणार आहे. तरीही सुमारे ३६ शेतकरी आपला आंबा या ठिकाणी विक्रीस ठेवणार आहेत. सदर महोत्सव सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत खुला राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता भालेराव यांनी केले आहे.