नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी उन्हाळ्यात नाशिककर ज्या महोत्सवाची आतूरतेने वाट पाहतात तो कोकणचा हापूस आंबा महोत्सव सुरू झाला आहे. नाशिककरांना नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेला निर्यातक्षम दर्जाचा हापूस आंबा या महोत्सवात उपलब्ध झाला आहे. कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे सीबीएस येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात हा आंबा महोत्सव सुरू झाला आहे. अक्षय तृतीयेसाठी मुबलक प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे.
कोकण पर्यटन विकास संस्थेचे संचालक आणि आंबा महोत्सवाचे आय़ोजक दत्ता भालेराव यांनी सांगितले की, संस्थेतर्फे १४ वा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॅाल्स. आंबा हा केवळ नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेलाच आहे. शिवाय अस्सल हापूस मिळण्याची खात्री आहे. याचबरोबर कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ,आवळा यापासून बनविलेला विविध प्रकारचा कोकणमेवाही महोत्सवात विक्रीस उपलब्ध आहे.
कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर, संगमेश्वर, दापोली आदी ठिकाणचे शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. वास्तविक या वर्षीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने आंब्याचे प्रमाण कमी असणार आहे. तरीही सुमारे ३६ शेतकऱ्यांनी आपला आंबा या ठिकाणी विक्रीस ठेवला आहे. सदर महोत्सव सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत खुला राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दत्ता भालेराव यांनी केले आहे.