नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात सातत्याने गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळेच जवळपास दररोज एक खुनाची घटना शहरात होत आहे. आताही भावानेच भावाचा खून केल्याची घटना कामटवाडे गावात घडली आहे. किरकोळ कारणावरुन हाणामारी हे नित्याचेच झाले असताना आता एकमेकाचा जीव घेण्याचेही प्रकार वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कामटवाडे येथे शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडुका मारून खून केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी हरि दामू निकम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयताचे नाव सदाशिव दामू निकम असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडा येथे मयत सदाशिव दामू निकम (५५ ) व त्याचा भाऊ हरि दामू निकम (५०) हे शेजारी राहतात. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास सदाशिव दामू निकम हे घरासमोर रस्त्यावर बडबड करत होते. यावेळी त्याचा भाऊ हरि दामू निकम हा सदाशिव जवळ आला व मला शिविगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावरुन दोघांमध्ये वाद होऊन त्याने सदाशिव याच्या डोक्यात लाकडी दंडुका मारला यात सदाशिव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असताना सदाशिव यांना मयत घोषित करण्यात आले.
Nashik Kamatawde Murder by Brother Crime