नाशिक – संपूर्ण नाशिककरांसाठी अभिमानाचा विषय असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिर संबंधी अनेक विषय सध्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष तथा मनसे प्रदेश उपाध्यक्ष, अमेय खोपकर यांनी महाकवी कालिदास कलामंदिर संदर्भात मराठी नाट्यसृष्टीतील कलाकार, रंगकर्मी व निर्मात्यांच्या व्यथा जाणून घेत या बाबत मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे. ते पुढीलप्रमाणे
१) वर्ष २०१९ मध्ये नवीन स्वरूपात कालिदास कलामंदिर सुरू झाल्यानंतर मा. आयुक्त, मा. स्थायी समिती अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष ह्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार रु. ५०० पर्यंत तिकीट दर असलेल्या नाटकांसाठी एक दर आणि रू. ५०० च्या पुढे दर असलेल्या नाटकांसाठी अधिक दर असे निश्चित झाले होते. परंतु नियमावलीत केलेल्या शब्दरचनेमुळे रू. ४९९ आणि ते ही फक्त पहिल्या चार रांगापर्यंत असलेल्या नाटकांसाठी एक दर असा अर्थ निघत आहे. महाराष्ट्रात इतरत्र कुठेही असा नियम लागू नाही.
मराठी नाट्य निर्माता संघाच्या निर्णयानुसार मुंबई, पुणे, नाशिक येथे रू. ५००, रू. ४००, रू. ३००, रू. २५० या नुसारच नाट्यप्रयोगाचे तिकीट दर ठेवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २०१९ पासून आजपर्यंत सादर करण्यात आलेल्या नाटकांपोटी भरलेली अनामत रक्कम वरील नियमामुळे नाटक कंपन्यांना मिळालेली नाही. वेळोवेळी मराठी नाटकांचे निर्माते आणि कलाकार मंडळीनी या बद्दल चर्चा आणि निवेदने दिलेली आहेत.
२) मध्यंतरी प्रशासनाने कोणासही न विचारता नाटकांच्या सत्राची वेळ बदलली. त्या नंतर काही अपरिहार्य कारणास्तव नाटक सुटण्यास नियोजीत वेळेपेक्षा थोडा विलंब झालेल्या प्रयोगांची अनामत रक्कम आजपावेतो रोखून ठेवण्यात आलेली असून हे अन्यायकारक आहे.
३) कोरोना काळातील पहिल्या लाटेत शासन निर्णयाने रद्द कराव्या लागलेल्या अनेक कार्यक्रमाचे भाडे व अनामत रक्कम आज पर्यंत मिळालेली नाही.
४) कोरोना पश्चात आर्थिक रीत्या खालावलेल्या नाट्य निर्मात्यांना ३ महिने आधी भाडे रक्कम गुंतवणे शक्य नसून पुढील काळात नाट्यगृह सूरू होताना निर्मात्यांना नियोजित प्रयोगाच्या ४ दिवस आधी नाट्यप्रयोग भाडे भरण्याची परवानगी मिळावी.
५) कलावंतांना प्रयोगा आधी विश्रांती साठी VIP रूम साठी भाडे आकारण्याची पद्धत राज्यात इतरत्र कुठेही नाही. मनपाने कलाकारांना याबाबत कुठलाही अतिरिक्त भार भरण्यास लावू नये. मध्यंतरी प्रशासनाने या बद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतू आजही VIP रूम भाडे भरावेच लागत आहे.
कोरोना महामारी पश्चात सद्य परिस्थितीत मराठी नाट्यसृष्टी कोलमडलेली आहे. पुढे परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नाट्यगृह सुरू होताना नाटककारांना आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. वरील बाबींवर आपण सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष तथा मनसे प्रदेश उपाध्यक्ष, अमेय खोपकर यांनी महाकवी कालिदास कलामंदिर संदर्भात मराठी नाट्यसृष्टीतील कलाकार, रंगकर्मी व निर्मात्यांच्या व्यथा नाशिक मनपा आयुक्तांकडे मांडतांना या बाबत तातडीने कारवाई करण्याचे विनंती केली. या वेळी मा. आयुक्त श्री. कैलास जाधव यांनी या बाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मनसेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक व संदीप देशपांडे, मनसे रस्ते आस्थापना अध्यक्ष, योगेश परुळेकर, मनसे चित्रपट सेना, अध्यक्ष, अमेय खोपकर, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, गट नेत्या, नगरसेविका नंदिनीताई बोडके, ज्येष्ठ नगरसेवक सलीम (मामा) शेख, नगरसेवक योगेश शेवरे, नगरसेविका वैशालीताई भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व वरिष्ठ पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.