नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी विरोध केल्याचा आरोप छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी केला. त्यानंतर स्वराज्य संघटनेचे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांनी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र आज गायकर यांनी पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आंदोलन मागे घेण्यामागील भूमिका स्पष्ट करतांना गायकर यांनी सांगितले की, सध्या रामनवमी उत्सव सुरू असल्याने आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे. संयोगिताराजे छत्रपती यांना काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाही या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होते. पण, सध्या रामनवमी उत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. आमच्या आंदोलनामुळे कुणालाही त्रास होऊ नये यासाठी आंदोलन मागे घेत आहे. संबंधित महंतांनी माफी मागावी ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा होता आरोप
इन्स्टाग्रामवर लिहीलेल्या एका पोस्टमध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी काळाराम मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत, असा थेट आरोप केला होता. रामनवमीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही पोस्ट अपलोड करुन त्यामध्ये आपला संपूर्ण अनुभव मांडला.
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्रांचे पठन करण्यापासून तेथील तथाकथित महंतांनी मज्जाव केला, असा आरोप संयोगिताराजे यांनी केला आहे. ‘छत्रपतींच्या घराण्याचा वारसा लाभलेला असल्याने महंतांच्या भूमिकेचा ठामपणे विरोध करू शकत आहे. ज्या मंदिरांमध्ये आज आपण नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविण्याचे काम कुणी केले ?, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाले. तसेच मोठ्या प्रमाणात काळाराम मंदिरातील महंतांना ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे या मुद्यावरून भाविकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली.
तुमच्या मध्यस्थीची गरज नाही
मुलांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते. तसेच ईश्वराला भेटण्यासाठी आणि त्याच्या दर्शनासाठी तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असा थेट निशाणा त्यांनी महंतांवर साधला आहे.
शाहू महाराजांचा वारसा
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सर्वसमावेशक विचारांमुळेच अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. त्यांचा वैचारिक वारसा चालविण्याच्या जबाबदारीमुळेच आत्मबल प्राप्त झाले. त्यामुळेच नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्यूंजय मंत्राचा जप करू शकले, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Nashik Kalaram Temple Swarajya Organization