नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडव्यांवरून काही वर्षांपूर्वी जशी सर्वसामान्यांची नाराजी असायची तशीच परिस्थिती आता नाशिकच्या काळाराम मंदिरात बघायला मिळत आहे. आणि ही नाराजी चक्क छत्रपती संभाजीराजेंच्या अर्धांगिणी संयोगिताराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे. मंदिरातील महंतांनी वेदोक्त मंत्र म्हणू दिले नाहीत, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले असताना तेथील तथाकथित महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्रांचे पठन करू दिले नाही, असे त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहीलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. संयोगिताराजे यांनी रामनवमीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी ही पोस्ट लिहून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी या सविस्तर पोस्टमध्ये आपला संपूर्ण अनुभव मांडला आहे.
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्रांचे पठन करण्यापासून तेथील तथाकथित महंतांनी मज्जाव केला, असा आरोप संयोगिताराजे यांनी केला आहे. ‘छत्रपतींच्या घराण्याचा वारसा लाभलेला असल्याने महंतांच्या भूमिकेचा ठामपणे विरोध करू शकत आहे. ज्या मंदिरांमध्ये आज आपण नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविण्याचे काम कुणी केले ?, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात काळाराम मंदिरातील महंतांना ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे या मुद्यावरून भाविकांमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे.
तुमच्या मध्यस्थीची गरज नाही
मुलांना आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसते. तसेच ईश्वराला भेटण्यासाठी आणि त्याच्या दर्शनासाठी तुमच्या मध्यस्थीची गरज नाही, असा थेट निशाणा त्यांनी महंतांवर साधला आहे.
शाहू महाराजांचा वारसा
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सर्वसमावेशक विचारांमुळेच अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. त्यांचा वैचारिक वारसा चालविण्याच्या जबाबदारीमुळेच आत्मबल प्राप्त झाले. त्यामुळेच नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्यूंजय मंत्राचा जप करू शकले, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Nashik Kalaram Temple Sanyogita Raje Allegation