नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांचे आम आदमी पक्षातून निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी आज नव्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थेची घोषणा केली आहे. येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात भावे समर्थकांची आज बैठक झाली. त्या बैठकीत भावे यांनी घोषणा केली आहे. त्यानुसार, त्यांच्या राजकीय पक्ष आणि संस्थेचे नाव निर्भय महाराष्ट्र पार्टी हे असणार आहे. तसेच, भ्रष्टाचार, लाचखोरीसह सर्वसामान्यांचे प्रश्न याद्वारे मांडण्यात येतील असे भावे यांनी जाहीर केले होते.
संघटनासाठी आग्रह
भावे हे अतिशय आक्रमक आणि सक्रीय सामाजिक कार्यकर्ते आहेत. जनतेच्या विविध समस्या आणि प्रश्नांबाबत ते आग्रही असतात. फेसबुक लाईव्हद्वारे ते सर्व समस्या मांडत असतात. तसेच वेळेप्रसंगी गरजूंना प्रत्यक्ष मदतीसाठी धावून जात असतात. त्यामुळे ते अतिशय लोकप्रिय आहेत. आपमधून त्यांचे निलंबन झाल्यानंतर नवीन संघटना आणि पक्ष स्थापन करण्याबाबत त्यांना आग्रह केला जात होता. त्याची दखल घेत अखेर भावे यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना केली आहे. तसेच, या पक्षाच्या सदस्य नोंदणीचे मोठे अभियानही त्यांनी राबविले आहे. त्यात उत्तम प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले आहे.
म्हणून आपने केले होते निलंबन
भावे यांचे आपमधून गेल्या महिन्यात निलंबन करण्यात आले होते. प्रदेश संघटन मंत्री नाविंदर अहलुवालिया यांनी तसे पत्र जाहीर केले होते. त्यानंतर कारवाई नंतर भावे यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली होती. भावे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते की, सर्व मित्रांना, हितचिंतकांना आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व जिवाभावाच्या परिवाराला सप्रेम नमस्कार
आपणास सर्वांना माहिती आहेच की पक्षाच्या स्थापनेपासून मी आम आदमी पार्टी या राजकीय पक्षात काम करत आहे. माझ्या कुवतीप्रमाणे पक्षाचे काम करण्याचा प्रमाणिक प्रयत्न मी नेहमीच केला आहे.
त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे विविध प्रश्न, सामाजिक विषय आणि भ्रष्टाचार या विषयांत शक्य तिथे खंबीरपणे भूमिका घेत मी संघर्ष केला आहे. या सर्व कामात माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला मोलाची साथ आणि पाठिंबा नेहमीच दिला आहे.
मागील काही काळात आप मधील अंतर्गत राजकारण हे अतिशय वेगळ्या पातळीवर गेलेले आहे याचाच परिपाक म्हणून माझे निलंबन मागच्या वेळी झाले होते. नंतर सर्वांच्या मागणीमुळे मला केंद्रीय नेतृत्वाने पक्षात पुन्हा घेतले आणि निलंबन रद्द केले. त्यानंतर सुद्धा मी पुन्हा माझे पक्षाचे काम जोरात सुरू ठेवले ते सुद्धा कोणतेही पद नसताना! पण काल अचानक माझे पुन्हा एकदा १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. लोकमत समूहाचे दर्डा कुटुंबीय यांना कोळसा घोटाळा केला म्हणून जी शिक्षा झाली त्याबद्दल मी Facebook Live करून भ्रष्टाचार आणि घोटाळा याविषयावर जे स्पष्ट आणि प्रखर मतप्रदर्शन केले या कारणाने माझे निलंबन झालेले आहे.
मी निलंबन आणि कारवाई चा नम्रपणे स्वीकार करत असुन आगामी काळात आम आदमी पार्टीचे कोणतेही काम यापुढे करणार नाही. जो पक्ष भ्रष्टाचार मुक्त देशासाठी निर्माण झाला आहे त्या पक्षातून भ्रष्ट लोकांवर टीका केली म्हणून जर निलंबन होत असेल तर याहून मोठे विडंबन दुसरे कुठले नसेल. तरी यापुढे मी पक्षाचे कोणतेही काम करणार नसून तसेच पक्षाच्या कोणत्याही व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही. निलंबन कारवाई फक्त माझ्यावरच झाली असल्यामुळे माझी पक्षातील सर्व सहकार्यांना विनंती आणि आवाहन आहे की आपण कोणीही पक्ष सोडू नये अथवा पक्ष विरोधी कोणतेही विधान करु नये. मी माझ्या निलंबना विरोधात कूठे ही न्याय मागणार नसून विनम्रपणे कारवाई चा स्वीकार करत आहे. धन्यवाद आपला जितेंद्र भावे
Nashik Jitendra Bhave New Political Party Announcement
Politics Social Organization