नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवैध डिझेल व इंधन विक्री केंद्राची तपासणीसाठी नाशिक जिल्हाधिकारी यांनी भरारी पथकांची स्थापनेसाठी आदेश निर्गमित केले असल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनने दिली. त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या एलडीओच्या नावाखाली बनावट डिझेलची विक्री वेगवेगळ्या कृषी सहकारी सोसायटी तसेच खाजगी व्यक्तीं मार्फत सुरू झालेली होती. आज रोजी नाशिक मध्ये सुमारे ३० पेक्षा जास्त मिनी LDO विक्री केंद्र कार्यान्वित आहेत. या सर्व प्रकाराबाबत नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून अनेक कायदेशीर बाबी तपासून व अशा अवैध पंपांना प्रत्यक्ष भेटी दिल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने सदरचे अनधिकृत विक्री केंद्र हे सर्रासपणे महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्र.DIESEL-2021/C.R.66/ C.S.27 दिनाक १२-११-२०२१ व केंद्र शासनाचे solvent, raffinate and slop (acquisitions, sale, storage, and prevention of use in Automilbes order २००० ता. ५ जून २००० व पेट्रोलियम रुल्स २००२ चे कलम १४४ तसेच विविध कंट्रोल ऑर्डर्सच्या सर्रासपणे उल्लंघन करून त्या ठिकाणी प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये सदरचे डिझेल सदृश्य इंधन हे एलडीओच्या नावाखाली विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत.
तसेच सदरचे इंधन विक्रीसाठी वापरत असलेले डिस्पेन्सिंग युनिट यांना कुठल्या प्रकारची वैधमापन विभागाची पडताळणीचा दाखला न घेता त्यातून सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे सदरचे जे डिझेल आहे हे मार्केट रेट पेक्षा सुमारे सहा ते सात रुपयांनी कमी असून त्यातून विक्री करणारे संस्थेला सुमारे सात ते आठ रुपये हा कमिशन मार्फत दिले जातात असे अधिक माहितीतून समजलेले आहे. सदरच्या विविध कार्यकारी सोसायटी यांनी देखील कायदेशीर बाबींचा माहिती न घेता तसेच फक्त जिल्हा उपनिबंधक यांचे पत्राचे आधारे त्यांनी सदरचे मिनी डिझेल पंप सुरू केल्याचे दिसून येत आहे वस्तूता: जिल्हा उपनिबंधक सहकार यांनी देखील योग्य त्या कायदेशीर बाबींची तपासणी त्यांच्या स्तरावर करणे आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी सदर सहकारी सोसायटी यांनी अशा प्रकारचे अवैध मिनी डिझेल पंप सुरू करण्यास प्रोत्साहन दिल्याचे दिसून येते.
सदरच्या घटनेमुळे राज्य शासनाच्या महसुलावर देखील त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे तसेच फक्त इंडस्ट्रियल वापरासाठी वापरले जाणारे एल डी ओ पेट्रोलियम उत्पादन असून त्याचा डेन्सिटी ही ८६० च्या घरातली व फ्लॅश पॉइंट हा सुमारे ६० च्या घरातील असल्याने हे कमी ज्वलनशील असलेले उत्पादन केवळ मोठ्या प्रमाणात कारखान्यांचे बॉयलर चालवण्यासाठी वापरले जाते. सदरच्या उत्पादनावर कोणत्याही प्रकारचे वाहन हे तांत्रिकदृष्ट्या चालू शकत नाहीत तरी देखील सदर उत्पादनाचा नावाचा वापर करून संबंधित पुरवठादार हा बोगस डिझेलचा पुरवठा नाशिक जिल्ह्यात सदरच्या बेकायदेशीर मिनी डीजल पंपांना करत असल्याचे दिसून येते सदर उत्पादनाची डेन्सिटी घेतली असता ती ८२५ येते जी वाहनांसाठी वापरत असलेल्या डिझेलची जी डेन्सिटी आहे त्याला मिळती जुळती असल्याने आमची खात्री झाली की सदरचे उत्पादन हे एलडीओ नसून हे डिझेलच आहे. याचे केवळ नाव बदलून इंधनाचा काळाबाजार नाशिक जिल्ह्यात सहकार विभागाच्या आशीर्वादाने सुरू झालेला आहे.
सदरच्या बेकायदेशीर कृत्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोलियम डीलर वेल्फेअर असोसिएशन मार्फत जिल्हाधिकारी यांना विस्तृतपणे निवेदन देऊन देण्यात आले होते परंतू त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आले नंतर नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशन १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर प्रकाराबाबत गांभीर्याने प्रतिबंधात्मक पावले शासनाने उचलण्याचे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले व त्याबाबत जर कार्यवाही न केल्यास नाशिक जिल्हा मधील सुमारे ५५० पेट्रोल पंप हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक विक्री बंद निषेध म्हणून पाळण्याचे यापूर्वी जाहीर केलेले आहे. असे असताना जिल्हाधिकारी यांनी तातडीने १६ ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक घेऊन नाशिक जिल्ह्यातील सर्व अवैध मिनी LDO विक्री केंद्र व तसेच बनावट बायोडिझेल पंप इत्यादींची तातडीने तालुकास्तरीय भरारी पथक नेमून प्रत्येक तालुक्यातील चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदरच्या आदेशाचे नाशिक जिल्हा पेट्रोलियम डीलर वेल्फेअर असोसिएशन स्वागत करते व त्याचप्रमाणे सदरच्या कारवाईसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशन जाहीर केलेले आहे.