नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात ग्रामविकास पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे असून अनेक लोककल्याणकारी योजना व विकास प्रकल्प राबविले जातात. त्यांच्या कामगिरीनुसार पंचायतराज संस्थांना प्रोत्साहित करून त्यांची कार्य संस्कृती वाढविणे यासाठी प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ठ काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना यशवंत पंचायतराज पुरस्कार ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यापुर्वी ऑगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागस्तरीय समितीने नाशिक जिल्हा परिषदेची पडताळणी केली सदर पडताळणीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेस नाशिक महसूल विभागात सर्वाधिक गुण मिळाल्याने विभागस्तरावरून राज्यस्तरीय यशवंत पंचायत राज समितीकडे शिफारस करण्यात आली होती त्यानुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची पडताळणी करण्याकरिता आज (दि.२७) रोजी राज्यस्तरीय मूल्यांकन समितीकडून छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजेंद्र देसले यांच्या समितीने आज नाशिक जिल्हा परिषदेस भेट देऊन कै. रावसाहेब थोरात सभागृह येथे प्रशासकीय कामाची पाहाणी केली. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, कृषि विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, इमारत व दळणवळण विभाग, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), वित्त विभाग, शालेय शिक्षण, ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, मनरेगा विभाग, पेसा विभाग या विभागांच्या प्रशासकीय कामकाजाची पडताळणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) दीपक पाटील यांच्यासह विभागप्रमुख व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.