नाशिक – कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव आणि अनुपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांची दखल घेत अखेर नाशकात येत्या सोमवारपासून (१९ एप्रिल) जनता कर्फ्यू लागू करण्यास सर्व व्यापारी संघटनांनी सहमती दर्शविली आहे. या संदर्भात नाशिक सिटीझन फोरमने समन्वयाची भूमिका घेतली असून सर्व संघटनांनी त्यास पाठिंबा दिला आहे.
नाशिक शहराची वाटचाल जनता कर्फ्यूच्या दिशेने होत असल्याचे वृत्त सर्वप्रथम इंडिया दर्पणने दिले होते. विविध संघटनांनी जनता कर्फ्यूसाठी पुढाकार घेतल्याचे त्यात म्हटले होते. सातपूरमध्ये सर्व पक्ष आणि विविध संघटनांनी एकत्र येत सात दिवसांच्या कडक जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा जनता कर्फ्यू सातपूर भागात सोमवारपासून (१९ एप्रिल) सुरू होणार आहे. याच धर्तीवर शहराच्या सर्व भागातील पक्ष, नेते, संघटना यांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून व्यापारी संघटनांनीही ऐकीची हाक दिली. म्हणूनच सर्व व्यापारी संघटनांची आज दुपारी ऑनलाईन बैठक झाली. त्यात नाशिक शहराच्या हितासाठी जनता कर्फ्यूला भक्कम पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे हा जनता कर्फ्यू सोमवारपासून लागू होण्याची चिन्हे आहेत. तो ८ दिवसांचा असेल की १० दिवसांचा याबाबत अद्याप निश्चितता झालेली नाही.
शहरातील सद्यस्थिती
नाशिक शहरात सध्या ३८ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३२३ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३७ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरासरी ३ हजारापेक्षा अधिक रुग्ण नव्याने बाधित होत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे.
—
नाशिक शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जनता कर्फ्यूचा विचार करणे आवश्यक आहे. आम्ही तयार आहोत. अन्य संघटनांनाही आवाहन केले आहे. व्यापारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अन्य संघटनाही तयारीत असल्याचे कळवित आहेत.
-
हेमंत राठी, अध्यक्ष, नाशिक सिटीझन फोरम
—
सातपूर विभागात सोमवारपासून जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभागात जनता कर्फ्यू लावण्यात यावा का या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज दुपारी बैठक झाली. त्यात सर्वानुमते नाशिक जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्याचे निश्चित झाले आहे.
-
संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स