नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक आणि जळगावकरांसाठी खुषखबर आहे. कारण, गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेली ट्रुजेट कंपनीची विमानसेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. आर्थिक गर्तेत अडकलेल्या ट्रुजेटला आता भक्कम आर्थिक साथ मिळाली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस ही कंपनी त्यांच्या सेवा सुरू करणार आहे. त्यात नाशिक आणि जळगावचाही समावेश आहे.
हैदराबाद येथील ट्रुजेट कंपनी कोरोनाच्या संकट काळात आर्थिक गर्तेत अडकली. त्यातच कंपनीच्या एका विमानाचे टायर कांडला विमानतळावर लँडिंग करतेवेळी फुटले होते. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) दिले होते. तसेच, हा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत सर्व उड्डाणे थांबविण्याचे निर्देश डीजीसीएने कंपनीला दिले होते. त्यातच कंपनीची आर्थिक स्थिती हालाखीची बनली. त्यामुळे कंपनीच्या सर्व सेवा ठप्प झाल्या. कंपनीचे देशभरात एकूण ६५० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. त्यांचे पगारही थकले आहेत. त्यामुळे कंपनीने विविध गुंतवणूकदारांशी चर्चा केली. मात्र, त्यात यश येत नव्हते. काही परदेशी गुंतवणूकदारांशीही बोलणी झाली. अखेर आता विन एअर या कंपनीसोबत ट्रुजेटची आर्थिक हातमिळवणी झाली आहे. कंपनीचे तब्बल २०० कोटी रुपयांमध्ये भागभांडवल खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कंपनीला उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.
ट्रुजेट या कंपनीने केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत अर्ज केला. त्यानुसार कंपनीला अहमदाबाद-जळगाव, अहमदाबाद-नाशिक, अहमदाबाद-कांडला, अहमदाबाद-जैसलमेर, अहमदाबाद-पोरबंदर हे मार्ग प्राप्त झाले. त्यानुसार कंपनीने सेवा सुरू केल्या होत्या. पण, गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद आहेत. मात्र, आता विन एअरने ट्रुजेटचे भागभांडवल खरेदी केल्याने आता पुन्हा ही कंपनी सेवा सुरू करणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस या सर्व सेवा सुरू करण्यासाठी कंपनीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.